"आमचा विरोध गुरुजींच्या पुराणमतवादी मानसिकतेला."
-इंद्रजीत घाटगे, कागल.
(माजी शिवप्रतिष्ठान कार्यकर्ता)
श्री शिवप्रतिष्ठानमध्ये माझ्याबरोबर काम केलेल्या व आजही करीत असणाऱ्या माझ्या बंधूंनो मी शिवाजी व संभाजी महाराजांना आदर्श मानून देव-देश-धर्मासाठी तळमळीने काम करणारा आपल्यातीलच एक कार्यकर्ता आहे. जोपर्यंत पटले तोपर्यंत मनात कधीही कींतू बाळगला नाही, ज्या दिवशी पटले नाही त्या दिवशी काम बंद केले. कोणताही कींतू मनात न ठेवता हा सर्व मामला श्रीशिवप्रतिष्ठानचे वरिष्ठ करीत असलेल्या सामाजिक द्रोह, सामाजिक पापाचा आणि म्हणूनच देशद्रोहाचा आहे. आम्ही विचार करू शकलो, आम्ही शाहू-फुले-आंबेडकर वाचले त्यामुळे एक मार्ग आम्हांला दिसला, जो आम्हांला सामाजिक, राष्ट्रीयदृष्ट्या योग्य वाटला त्या मार्गावर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला प्रतिष्ठानमध्ये काम करीत असता जाणवले की, आपल्या काही लोकांमध्ये आंधळ्या श्रध्दा आहेत. विचार करण्याचे सर्वाधिकारच जणू आम्ही त्यांना देऊन टाकले आहेत. आणि त्यांच्या शिवाय आपला हा आक्राळ- विक्राळ हिंदू समाज हा देश पुढे मार्गक्रमण करूच शकत नाही हे आपले वागणे पुर्णतः चुकीचे असून आपणही अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि मगच ते काम स्वीकारले पाहिजे. तर आणि तरच आपण शिवप्रभूंचे खरे मावळे ठरू. हे माझे मनोगत माझ्या शिवाजी संभाजी महाराजांच्या, भारतमाता आणि आपला समाज यांच्या विषयीच्या प्रेमापोटी मला जे सुचले ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण मोठ्या मनाने वाचाल आणि मला समजून घ्याल हीच अपेक्षा.
कागलमध्ये स्वतः स्थापन केलेल्या सुप्तशार्दूल बालोत्कर्ष संस्था नावाच्या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेचे आम्ही कार्यकर्ते. लहानपणापासून सामाजिक कामाची आवड. सांगावच्या मित्रांकडून शिवप्रतिष्ठान संबंधी कळले, मोहिमेत सामिल झालो. शिवाजी महाराजांच्या आकर्षणामुळे कामाला लागलो. स्वतःला महाराजांचे मावळे समजून तन-मन-धनाने शिवप्रतिष्ठानचे काम ७-८ वर्षे निष्ठेने केले. आटोकाट प्रयत्न करून भारतमातेच्या एक-एक सुपुत्राला प्रतिष्ठानशी जोडत गेलो. त्यासाठी बेळगाव-गोव्यापासून साताऱ्यापर्यंत अथक प्रयत्न केले. आमच्या तालुक्यातील जवळपास सर्वच गावी आम्ही शिवप्रतिष्ठानच्या प्रसारासाठी दोन-चार वेळा जाऊन आलो आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गारगोटी, निपाणी, पन्हाळा येथे स्वत: बैठका घेतल्या. काही ठिकाणी यश तर काही ठिकाणी अपयश आले, म्हणून कधी थांबलो नाही. चढत्या वाढत्या संख्येने मोहिमेत सहभागी होत होतो. सांगलीवाल्यांनी सांगितलेला प्रत्येक कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणात कागलमध्ये राबवीत होतो. शिवप्रभूंना आदर्श मानले होते त्यांच्याच आदर्शाची ज्वाला मनामध्ये कायम धगधगत होती म्हणूनच हे शक्य झाले.
पण प्रतिष्ठानच्या वरिष्ठांचे वागणे मात्र वेगळेच होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रतिगामी संघटनेत २५ वर्षे काम करूनसुध्दा गुरुजींनी आम्हाला नाही म्हणून सांगितले. राजा शिवछत्रपती पुस्तकाचे आमचे १००० प्रतिंच्या उद्दीष्टांपेक्षा कितीतरी जास्त पुस्तकांचे मूल्य देऊनही वेळ का होतो याची चौकशी केली असता तुमचे पैसे परत घेऊन जा हेच उत्तर ठरलेले. लोकांना परत देण्यासाठी आम्ही शुल्क जमा करून घेतले होते काय ? लेन प्रकरणात गुरूजींनी घेतलेली 'तेरी भी चूप मेरी भी चूप' ची भूमिका. आपले पंढरपूरचे एक कार्यकर्ते पुण्यात उच्च शिक्षण घेत आहेत परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण बंद होण्याची पाळी आली. ना. पतंगराव कदमांकडून या कार्यकर्त्याच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपचे काम गुरुजींच्या एका शब्दावर झाले असते. कारण ना. कदम गरीब हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना लाखो रूपयांची स्कॉलरशिप दरसाल देतात. पण गुरुजींनी या प्रकरणात सरळसरळ कानावर हात ठेवला. आपल्याच कार्यकर्त्याच्या (ज्याने मागील चार मोहिमा केलेल्या आहेत) शिक्षणासाठी इतकाही प्रयत्न आपण करणार नसू तर आपले हे सर्व संघटन कार्य कूचकामी आहे.
आम्ही प्रतिष्ठानपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला त्याचे तत्कालीन कारण म्हणजे गुरूजींनी केलेला 'तालिबानी बॉम्बस्फोट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडवरील शिवसमाधीची केलेली कथित विटंबना आणि या महाभागांकडे म्हणे त्याचे पुरावे आहेत. 'या सांगलीला, मी दाखवतो' असे आम्हाला प्रचारकी थाटात सांगतात. हिंदू संघटन हे आमचे कार्य करताना यामुळे होणारे धोके आम्ही गुरुजींना सांगीतले. तर गुरुजी म्हणतात माझ्याकडे पुरावे आहेत आणि सत्य लोकांना कळले पाहिजे. आम्हाला जे सत्य समजले उमजले तेही लोकांना कळले पाहिजे.
मराठी सत्तेच्या अस्तानंतर रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे, महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे, 'कुळवाडीभूषण' (शेतकऱ्यांचा राजा) नावाचा ४५ पृष्ठांचा शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिणारे, बहुजन समाजातील आपण सर्वजण जे शिक्षण घेत आहोत त्याचेही सर्वश्रेय ज्यांना जाते, मुलींची पहिली शाळा सुरू करणारे, चातुर्वर्ण्य मोडून समानतेच्या तत्त्वांवर नवीन समाजाची निर्मिती व्हावी, याचा ज्यांनी ध्यासच घेतला ते महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी सनातन प्रभात नावाच्या बुरसटलेल्या विचारांच्या बहुजन समाजद्रोही संघटनेने प्रकाशित केलेले एक पुस्तक दाखवून म. फुलेंना भिडे गुरुजी 'नीच' म्हणाले. तर दहा पुस्तके दाखवून त्यांना चांगलेहि म्हणता येईल आणि ह्याच न्यायाने जर लेनने लिहिलेले किंवा तसाच पूर्वग्रह ठेवून एखाद्या लेखकाने लिहिलेले पुस्तक दाखवून गुरुजी शिवाजी महाराजांनाही त्याच पंगतीत बसवणार आहेत काय ?
जेम्स लेन प्रकरणाबाबत तर देशातील तमाम हिंन्दुत्ववादी उघडे पडले (कारण त्यांचे नेतृत्व एका विशिष्ट मानसिकतेचे लोक करीत आहेत) लेनने शिवाजी महाराजांचा जीवशास्त्रीय बाप (बायोलॉजीकल फादर) दादोजी कोंडदेव असल्याचा शोध लावला (यालाही पुण्यातीलच काही लोक जबाबदार आहेत.) या प्रकरणाबाबत शिवप्रतिष्ठानने साधा निषेधही व्यक्त केलेला नाही. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात, भारतात प्रक्षोभक भावना निर्माण झाली पण तुम्ही-आम्ही शिवभक्त, शिवसैनिक मात्र चिडीचूप. कारण गुरूजींकडून आपल्याला याबाबत कसलेही मार्गदर्शन मिळाले नाही. कारण जेम्स लेनने गावगप्पा सांगण्याच्या बहाण्याने जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते खरे असावे असे मानले तरी शिवाजी महाराजांविषयी आपल्या आदर भावात अंतर कशामुळे पडावे ? शिवाजीचे अद्वितीयत्व त्याचा बाप कोण होता यावरून ठरत नसून जे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यावरून ठरते (संपादकीय मा. धर्मभास्कर, जानेवारी २००४) या मासिक धर्मभास्करची वार्षिक वर्गणी आम्हाला गुरुजींनी भरायला लावली. धर्मभास्करच्या संपादकाला शिवाजीचा बाप कोण होता, ह्यामुळे काही फरक पडत नाही, पण जिजाऊ माँसाहेबांच्या चारित्र्यावर त्यामुळे काळीमा फासला जातो. परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या आमच्या राजाच्या मातेवर 'राष्ट्रमाते' वर एवढा मोठा बिनबुडाचा आरोप केला जातो आणि तुम्ही-आम्ही शिवभक्त षंढासारखे आजही गप्प आहोत याचा हिशेब आपल्याला शिवाजी महाराजांना द्यावा लागेल आणि त्यावेळी आपण मोठे अपराधी ठरू. शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी लेन प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करावा. शिवाजी-संभाजी याविषयी तुमच्या-आमच्या महाराष्ट्रीयांच्या मनात असलेल्या श्रध्देचा हा शुध्द व्यापार होय. आमच्या मराठी मनात असलेली ही तगमग जेम्स लेन प्रकरणाचा विचार करताना ठळकपणे समोर आली. आमच्यासारख्या बहुजन समजातील तरुणांची उमेदीची वर्षे 'जय' नादात अक्षरश: वाया घालवण्याचा हा प्रकार आहे. ही प्रवृत्ती आणखी किती पिढ्या बाद करणार आहे हा प्रश्न आहे.
आजपर्यंत आपण प्रतिष्ठानचे ठराविक चार कार्यक्रम सोडले तर कोणताही समाज उपयोगी कार्यक्रम राबविला नाही. सध्या आपल्या समाजात असणारे अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता, बेरोजगारी, जातीपाती (चातुर्वर्ण्य), भ्रष्टाचार, पर्यावरणाचे प्रश्न या आपल्या समाजात असणाऱ्या वाईट गोष्टींबरोबर लढण्याविषयी गुरुजींनी कधी सांगितलेच नाही.
शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना शेतकरी, गरीब जनतेच्या हितासाठी अखंड प्रयत्न केले. म्हणूनच आजही सामान्य माणसाला 'शिवराज्य' यावे असे वाटते. स्वारीवर असता शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे सांगणारे, परस्त्री मातेसमान मानणारे, अतिवृष्टी किंवा दुष्काळात रयतेला शेतसारा माफ करणारे, उद्योग-व्यापार आपल्या राज्यात वाढावा म्हणून खास प्रयत्न करणारे, धरणे बांधणारे, पूल बांधणारे, खास आमरायांची लागवड करणारे, वृक्षारोपणासाठी गावोगावी देवराईची निर्मिती करणारे महाराज आम्हाला कधी कोणी सांगितलेच नाहीत. या विषयीचे साधे उल्लेखही भिडे गुरुजींच्या बोलण्यात येत नाहीत. 'माझी बोटीतील जगप्रसिध्द उडी, मला झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, हे सारे जरी विसरलात तरी चालेल; पण मी केलेले रत्नागिरीतील सामाजिक काम कधीही विसरु नका' असे म्हणून चातुर्वर्ण्याचा धिक्कार करणाऱ्या सावरकरांना 'हिंदुत्व'वादी सावरकर म्हणून लोणच्यासारखे तोंडी लावायला वापरून सावरकर विचारांची कुचेष्टाह गुरूजी करतात. समग्र सावरकर आपण सर्वांनी अभ्यासलेत तर ते आपल्यालाही कळेल..
आम्ही शिवप्रतिष्ठान सोडले म्हणून शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली दिली, राष्ट्रीय विचार सोडून दिला असे नाही, कारण शिवाजी महाराज- हिंदूत्व किंवा देशाचा विचार करण्याचे सर्वाधिकार काही कुणाला वंशपरंपरागत दिलेले नाहीत. कारण कालपर्यंत ज्या कागलवाल्यांचे दाखले चांगले कार्यकर्ते म्हणून गुरुजी सर्वत्र डंका पिटत फिरत होते, तेच आज वैचारिक मतभेदांमुळे बाजूला झाले की, मराठा सेवा संघाकडून, राजकरणी मंडळींकडून पैसे घेऊन बदलले, शिवधर्मात गेले असे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ही जात पैसे घेऊन बदलणारी नाही, ही शिवाजी- संभाजीची जात आहे. कारण एकापेक्षा जास्त इंद्रजीत घाटगे कागलमध्ये असू शकतात आणि राजकीय बोर्डाव त्यांचे नाव येऊ शकते आणि भिडे गुरुजींना आमचे उघड आव्हान आहे कुठल्याही व्यासपीठावर याविषयावर त्यांच्या बरोबर समोरासमोर यायला आम्ही तयार आहोत. भिडे गुरुजींना आमचा असणारा विरोध त्यांच्या प्रतिगामीत्वाला पुराणमतवादाला आहे. बाकी विषय गौण आहेत.
"शिवराज्य मंच' नावाची नवीन संघटना आम्ही स्थापन केली आहे. २१ व्या शतकातील संपन्न भारत निर्माणासाठी प्रयत्न करणे, कार्यकर्त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करणे, चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडून सर्व समाज एका समानतेच्या तत्त्वावर उभा करणे, त्याचबरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून संघटनेच्या कामात पारदर्शकत ठेवणे, शिवाजी महाराजांना आदर्श मानल्यामुळे पुराणमतवादी असे आपल्याला कोणी म्हणू नये. कारण काळाबरोब येणारे बदल आपण मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजेत तर आणि तरच कालचक्रात हा समाज, हा देश टिकणार आहे वाढणार आहे, प्रागतिक म्हणून स्वतःची छाप राखणार आहे.
*****************************
हिंदूधर्मातील जाती व्यवस्थेविषयी
"अस्पृश्यतेचं मूळ जातिव्यवस्थेत आहे. जाती व्यवस्थेचे मूळ चातुर्वर्ण्यात आहे. चातुर्वण्याचं मूळ ब्राह्मणी धर्मात आहे. ब्राह्मणी धर्माचं मूळ अधिकार लालसेत अथवा राजकीय सत्तेत आहे.
हिंदू समाजातील घटकात एकत्रीकरणाची भावना टिकवील असं सामाजिक ऐक्य बंधन नाही. जात आहे. तोपर्यंत हिदूंचं संघटन नाही. आणि संघटन नाही, तोपर्यंत हिंदू कमकुवत राहतील, लीन राहतील. जातीमुळे चांगल्या कार्यासाठीसुध्दा संघटन आणि सहकार्य करणे अशक्य ठरते.
हिंदू मानसिकता साधुत्वावर पटकन विश्वास ठेवते. ती खरी आहे का आभास आहे याची शंका घेणे त्याला आवडत नाही."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा