संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्रावरून भेदभावाला सामोरे जावं लागलं.
ब्राम्हणी व्यवस्थेत हे मुळातच खोलवर रूजलेलं आहे. त्यात नवीन काही नाही. पण नवीन हे आहे की १२२ वर्षापूर्वी जे शाहू महाराजांनी सोसलं त्यावरून बहुजनातील एकही जात शहाणी झाली नाही हे.
बहुजन हे ब्राम्हणेतर समजले जातात. वास्तवात ते तसे नाही.
मराठ्यांनी वेद, पुराणे, कर्मकांडे यांना नकार दिलेला नाही. कारण जातीच्या उतरंडीत त्यांना त्यांचे स्थान सर्वोच्च वाटते.
जात हे हिंदू संस्कृतीचे आजअखेर न विझलेले वास्तव आहे. त्यातून उच्च आणि नीच अशी विषमतेची दरी हजारो वर्षे कायमची पडलेली आहे. ही दरी तथाकथित उच्चवर्णियांनी सांभाळली आहे. ब्राम्हण आणि मराठा किंवा क्षत्रिय या दोघांनी वेदांना आणि हिंदूंच्या धर्मग्रंथांना आजही प्रमाण मानले आहे. मराठ्यांनी बहुजनात स्वतःला गणले असले तरी ते स्वतःला हिंदू धर्मिय समजतात.
ब्राम्हण नको पण हिंदू धर्म हवा म्हणणारे हे विसरतात की हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, ब्राम्हणी कर्मकांडे आणि ब्राम्हणी थोरवी. त्याला तर स्विकारावे लागणारच. हा गुंता मराठ्यांना व बहुजनातील हिंदू धर्म मानणार्यांना ब्राम्हणी व्यवस्थेत अडकवतो. त्यामुळे एकीकडे हिंदू म्हणवून घ्यायचे आहे आणि दुसरीकडे ब्राम्हणी व्यवस्थेला नकार द्यायचा आहे हे शक्य नाही.
हिंदू म्हणजे ब्राम्हणी व्यवस्था आहे. कर्मकांडे ब्राम्हणी आहेत. शुद्ध कर्मकांडे ब्राम्हणांनीच करायची आहेत. कारण सर्व धर्मग्रंथात ब्राम्हणांनी सांगितलेले मंत्र-तंत्र-विधी पावतात असे घोषित केले आहे.
दैवाधिनं जगत्सर्व, मंत्राधिनं देवता, ते मंत्रा विप्र जानंति, तस्मात् ब्राम्हण देवता ll
म्हणजे खुद्द ब्राम्हण देवतातुल्य आहे असे हिंदू संस्कृतीत सांगितले गेले असेल तर हिंदू म्हणजे ब्राह्मणास देव मानणे आलेच!
ब्राम्हणी वृत्तींनी "हिंदू " या शब्दाची ढाल करून दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. स्वतःचे जातवर्चस्व कायम ठेवणे आणि ब्राम्हणेतरांना एकत्र करणे. हा फास अत्यंत खुबीने हिंदू समाजात आवळला गेला आहे. तो सोशल मिडिया, वृत्तपत्रे, टीव्ही, अशा माध्यमांतून तळागाळापर्यंत पोहोचवला आहे.
ब्राम्हण नको पण हिंदू धर्म हवा असे घडणे शक्य नाही. म्हणूनच हिंदू धर्म रक्षणार्थ वगैरे जे लढतात, लढले, ते सर्व ब्राम्हणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी लढताहेत व लढत राहतील.
मग ते छत्रपती असोत वा हमाल!
आणि ब्राम्हणी व्यवस्था ही विषमतावादी व्यवस्था आहे. लोकशाही विरोधी आहे!!
- डाॅ. प्रदीप पाटील
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा