ads header

पाडवा महामेळाव्यातील आपली उपस्थिती महासंघाला निश्चित बळ देईल :मुळीक

पाडवा महामेळाव्यातील आपली उपस्थिती महासंघाला निश्चित बळ देईल :मुळीक

कोल्हापूर :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौकात चैत्र पाडवा महामेळावा
ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास धरण्याचा राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचा संदेश
आज प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत सतत चालावे लागते. थांबल्यास शर्यतीतून बाद ठरवले जाते. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाला जात-धर्म कळत नाही. यासाठी मराठा समाजाने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास आणि व्यावसायिकतेचा ध्यास धरावा असा संदेश अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिला. अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित चैत्र- पाडवा महामेळाव्यात ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने यंदा पहिलाच दसरा चौकात चैत्र- पाडवा महामेळावा झाला. या मेळाव्याला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. उद्योजक व्ही.के.पाटील, डॉ. संदीप पाटील, शशिकांत पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, एम.जी.पाटील विचारमंचावर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करुन मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना कोंढरे म्हणाले, कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन करताना आयुष्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये नेमके काय कमावले ? आणि काय गमावले? याचा जोपर्यंत आपण हिशोब करत नाही, तोपर्यंत आपल्याला आपले स्थान कळत नाही. 

हे स्थान कळायचे असेल तर चिकित्सा, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. करवीरनगरीने देशातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये तयार करून दिला. 1902 च्या अगोदर उद्योगाची मुहुर्तमेढ याच नगरीमध्ये रोवली. राजाराम महाराजांनी विमानतळ आणले. त्या काळात इतका विकास झाला असताना आज दरडोई उत्पन्नात कोल्हापूर बाराव्या- तेराव्या क्रमांकाला आहे.

मराठा समाजाने नेतृत्वामध्ये सगळ्यांना सामाजिक न्याय देण्याची भूमिका घेतली. पण त्यांच्याच ताटातील कोणीतरी काढून नेले आहे. अर्थ, शिक्षण, रोजगार ही आत्ताच्या काळातील आव्हाने आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत आपण तंत्र-ज्ञानात कुठे आहोत याचा विचार करायला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाला धर्म, जात कळत नाही. ते तंत्रज्ञान कोण वापरते? कसे वापरते? हे महत्वाचे आहे.

जमिनीविषयी बोलताना ते म्हणाले, मराठा समाज भूमिहिन होत चालला आहे. ग्रामीण भागातील जमिनीचे तुकडे करुन त्या विकून कोल्हापूरचा मुळशी पॅटर्न करू नका. कोल्हापूरच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, तंत्रज्ञान ज्या दिवशी अपडेट होईल त्या दिवशी त्याचा फायदा कोल्हापूरच्या सर्व जनतेला आहे.

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे. आरक्षण पाहिजे असेल तर दिल्ली हा एकच मार्ग आहे. यासाठी लाल महाल ते लाल किल्ला असा लाखाचा मोर्चा काढण्याची गरज आहे. आरक्षणाअभावी तीन ते चार पिढयांचे नुकसान झाले आहे.तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. आरक्षण आपल्या हक्काचे असून त्यासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल. मराठा महासंघाच्या प्रयत्नामुळे सारथी संस्थेची निर्मिती झाली असून या माध्यमातून मराठा तरुण तरुणींना लाभ होत आहेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असले तरी राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. यासाठी बँकांच्या विरोधात मोहीम घ्यावी लागेल.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे एम.जी.पाटील म्हणाले, आण्णासाहेब पाटील यांनी सीमा प्रश्नाच्या लढ्यात सहभाग घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. पण अद्यापही सीमाप्रश्न लोंबकळत आहे. यंदा तर कर्नाटक सरकारने महामेळावाही घेऊ दिला नाही. यामुळे कोल्हापुरात मेळावा घेतला. प्रा.शिवाजीराव भुकेले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शासनाचे नाक दाबले पाहिजे असे सांगितले.महासंघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, मारुती मोरे, शैलजा भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते राजेंद्र कोढरे यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा देवून सत्कार करण्यात आला. मेळाव्याला विजय काकोडकर, चंद्रकांत चव्हाण, दीपा डोणे, शंकरराव शेळके,अवधूत पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सामाजिक रुढी परंपरेतून बाहेर यावे
आज विज्ञान तंत्रज्ञानाची गती वाढत आहे. पण मराठा समाजात आजही रुढी- परंपरेत अडकला आहे. यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारी,व्यसनाधीनता वाढत आहे. विवाह होत नाहीत. यासाठी समाज म्हणून काम करण्याची गरज मेळाव्यात व्यक्त करण्यात आली.

Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा