खा.शरद पवारांना आपला नेता म्हणतांना कुणबी नसलेल्या मराठा समाजाला भीती वाटू शकते-शिवाजी कवठेकर
बीड दि.12(प्रतिनिधी):- मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आता नैराश्याच्या टोकाकडे चालली आहे, जे सगळ्याच समाजासाठी धोक्याचे आहे.कारण राज्यात सगळ्यात जास्त संख्या असलेला हा समाज आहे,म्हणजे राज्यातील प्रत्येक तिसरा माणूस हा मराठा आहे.पण तरीही या समाजाने आजपर्यंत कधीही लोकशाही मार्गाने व शांततेने आरक्षणाची मागणी केलेली आहे.पण कोणी काही त्याची दखल घेतली नाही आणि आजही घ्यायला तयार नाही.शिवाय पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, 42 तरुणांनी मी आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे,असे म्हणून बलिदान दिलेले आहे.आणि आज पाच वर्षांनंतरही, मराठा समाजातील तरुण जीव देण्याची तयारी ठेवून आपल्या पुढल्या पिढीसाठी आरक्षण मागत आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशा परिस्थितीत सध्या मराठा समाज आहे.म्हणजे जीव देण्याची तयारी असलेला समाज जर निराश झाला,तर तो आत्मघात करण्याऐवजी त्याविरुद्धही वागू शकतो, हे आता राज्यकर्त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी लक्षात घेण्याची गरज आहे, असे आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
पत्रकात म्हटले आहे की,खा.शरद पवारांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण एक, मराठा समाजाची आजची वाईट अवस्था होण्यास शरद पवार यांनी 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना ओबीसींना दिलेलं आरक्षण कारणीभूत आहे.कारण ते चुकीच्या पध्दतीने व ओबीसीचा सर्वात मोठा घटक असलेल्या मराठा समाजाला वगळून उर्वरित ओबीसींना देण्यात आलेले आहे, असा मराठा समाजाचा आक्षेप आहे. पण असे असूनही, त्याचा कोणी कधी खुलासाही करत नाही, किंवा मराठयांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणही देत नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.कारण दोन, शरद पवार हे 1978 ला पुलोदचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते सत्तेवर असोत किंवा नसोत, पण त्यांची भूमिका व त्यांचे मत राज्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे व निर्णायक राहिलेले आहे.आणि आजही त्यांच्या पक्षाचे दोन आकड्यांत खासदार नसले तरी,एक नेता म्हणून तेच राज्यात सर्वांसाठीच सर्वोपरी आहेत.आणि असे पवार साहेब, गेल्या 29 वर्षात म्हणजे ओबीसींना आरक्षण दिल्यापासून, ज्या ज्या वेळी मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ आली, त्या त्यावेळी ओबीसींना आपणच दिलेल्या या बेकायदेशीर आरक्षणाची पाठराखण करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळू न देणारी भूमिका घेताना दिसले आहेत.जे कोड्यात टाकणारे आहे.वास्तविक पाहता,त्यांनी दिलेलं ओबीसी आरक्षण हे एका मुख्यमंत्री पदासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीने केलेले एक गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे.ज्याचा खुलासा आजपर्यंत शरद पवारांनी कधी केलेला नाही.आणि त्यामुळे त्यांना आपला नेता म्हणतांना,कुणबी नसलेल्या मराठा समाजाला भिती वाटू शकते, इतके भयंकर कृत्य त्यांच्या हातून घडलेले आहे.कारण तीन, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो.पण आरक्षणासाठी गेल्या सोळा सतरा वर्षांपासून आक्रोश करणाऱ्या मराठा समाजाच्या बाजूने या पक्षाचा एखादाही कार्यकर्ता, नेता किंवा लोकप्रतिनिधी भूमिका घेताना दिसलेला नाही, आणि दिसतही नाही, हे #मराठा समाजासाठी खूप संतापजनक आहे. कारण चार, ओबीसी आरक्षण लागू झाल्यापासून तीनशे साडेतीनशे जातींना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्यात आले.2004 ला, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारचे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा समावेश आरक्षणात करण्यात आला.पण त्यावेळी कुणबी नसलेल्या मराठा समाजाला मात्र का टाळण्यात आले?याचा खुलासा आजपर्यंत कुणीही केला नाही.जे विचार करण्यासारखे व खूप गंभीर आहे.कारण शरद पवार हे कुणबी मराठा आहेत.कारण पाच, जसे शरद पवार हे मराठा समाजाला वंदनीय आहेत, तसेच त्यांचे अनुयायी असलेले छगन भुजबळ हेसुद्धा ओबीसी समाजासाठी आहेत.पण छगन भुजबळ मात्र, लोकशाही व शांततेच्या मार्गाने आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण देण्यास नेहमीच टोकाचा विरोध व तोही एखाद्या गावगुंडाला शोभेल अशा भाषेत करताना दिसले आहेत.ज्याचे समर्थन कोणीही करू शकत नाही.पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भुजबळांना त्यांच्या वागण्याची कधी समज दिल्याचे दिसलेले नाही.म्हणजे एका अर्थाने भुजबळांचे ते समर्थनच आहे.आणि राष्ट्रवादी पक्षाने सांगितलेलेच ते बोलत होते, असाच त्याचा अर्थ होतो.जे शांतपणे आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाला डिवचण्यासारखे आहे.आणि कारण सहा सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे, आजपर्यंत शरद पवारांसह सर्वच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण या विषयावर फसवलेले आहे, याबद्दल मराठा समाजाच्या तरुणांची खात्री झाली आहे.आणि जे पुराव्यानिशी दाखवून देता येते.पण त्यातील, दलित असलेले सुशीलकुमार शिंदे व ब्राह्मण असलेले देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे वगळता, बाकी सगळे मराठा आहेत.पण तरीही त्यांनी मराठा समाजाला फसवले आहे, जे या सगळ्यांना लाज वाटायला लावणारे आहे.या सहा कारणांकडे विचारपूर्वक पाहिल्यास, राज्यकर्ते व खा.शरद पवार हे मराठा समाजाला नेमके काय समजतात? मराठा समाजाला आरक्षणाबाबतीत सतत फसवण्याची भूमिका घेऊनही मराठा समाजाने मात्र त्यांचा आदरच करायला हवा असे त्यांना वाटते का? हे गंभीर प्रश्न आहेत.त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा.शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येत नसेल, तर तसे स्पष्टपणे सांगण्यासोबतच ते का देता येत नाही? हे सुद्धा सांगायला पाहिजे.किंवा ओबीसींना दिलेले 32 टक्के आरक्षण, हे संविधानाच्या नियमानुसारच दिलेले आहे.आणि त्याच्यावर मराठा समाजाचे हक्क सांगणे चुकीचे आहे, हे पटवून द्यायला पाहिजे.या दोन गोष्टी ताबडतोब करायला पाहिजेत.कारण, जालना जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत.आणि चार पाच दिवसांपूर्वी उपोषणामुळे अत्यवस्थ झालेले चार तरुण मरता मरता वाचले आहेत.पण त्यांना मुख्यमंत्र्यांनी खोटे बोलून व दबाव टाकून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले आहे.नसता, 2018 मधील पहिल्या 42 नंतर या चार पोरांचीही आरक्षणासाठी बलिदान करणाऱ्यात नोंद झाली असती.पण नेहमीच असे होईल असे सांगता येऊ शकत नाही.कारण,परिस्थितीमुळे हताश झालेले मराठा समाजातील भावनिक पातळीवर निर्णय घेणारे तरुण, बुद्धीचा वापरच न करणाऱ्या व आपले राज्यकर्ते आणि नेते किती नालायक व निर्दयी आहेत हे समजून न घेता आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना उपलब्ध होऊ शकतात, आणि त्यावेळी जीवितहानी होऊ शकते.म्हणून, सरकारने वरील दोन्ही मुद्यांचा खुलासा करावा.आणि हेही सांगावे की, ज्या ओबीसी आरक्षणामुळे आजची दारुण परिस्थिती मराठा समाजावर ओढवली आहे, ते आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसींनी कसलाही संघर्ष केलेला नाही.आणि असे केल्यास मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा आक्रोश निश्चितपणे व व्यवस्थितपणे शांत करता येऊ शकतो.नाहीतर, आज जीव द्यायची तयारी ठेवून आपल्या पुढल्या पिढीसाठी आरक्षण मागणारा मराठा तरुण जर बिथरला, तर लगेच नाही पण भविष्यात मात्र मराठा समाजाच्या नेत्यांना सुरक्षा व्यवस्थेत फिरण्याची वेळ येईल,अशी परिस्थिती लवकरच निर्माण होऊ शकते! हे मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा आरक्षणाबाबतीत कधीच खरं न बोललेल्या नामदार एकनाथ शिंदे व खासदार शरद पवार साहेब यांनी लक्षात घेण्याची गरज आहे!, असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा