चला राजऋषी शाहू छत्रपतींच्या हिंदुत्वाचे स्वागत करूया...!
भाग-१
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राजर्षी शाहूंच्या भूमीमध्ये मोर्चा निघाला या मोर्चामध्ये शाहू महाराजांनी हिंदुत्वाची झेंडा खांद्यावर घेतला होता असे सांगण्याचा प्रयत्न झाला ! एवढेच नाही तर काही मान्यवर महोदयांनी शाहू महाराजांनी वैदिक स्कूल का काढले याचा अभ्यास करावा, असाही सल्ला दिला होता . शाहू महाराजांचा जगदगुरु नेमणूक- वैदिक शाळा काढण्यामागे काय हेतू होता. हे पुढे थोडक्य दिले आहे!!! शाहू महाराजांचे सहकारी आणि विचारांचे पाईक असणाऱ्या नामदार भास्करराव जाधव ,भाई माधवराव बागल ,क्षात्रजगद्गुरु इत्यादी चे हिंदुत्वाचे विचार इथून पुढे "४८" भागात आम्ही लोकांपर्यंत आणणार आहोत!
"ब्राह्मणेतरास ब्राह्मणवर्ग धार्मिक व सामाजिक बाबतीत हीन लेखतो हे अगदी उघड आहे. हिंदू जनतेचा धर्म वैदिक असून तो सर्व संग्रहक असता ही, ढोंगी प्रचलित ब्राह्मणी धर्माने त्याचे स्वरूप अकुंचित व पुराणादी पौरूषेय कल्पना मिश्रित केले आहे. यायोगे खऱ्या वैदिक धर्माचे उज्वल स्वरूपाची जाणीव जनतेतून लुप्तप्राय होऊन गेली आहे. ही अत्यंत शौचनीय गोष्ट आहे. अशा स्थितीमुळे लोकांचे वैदिक पद्धतीने संस्कृती होण्यास व त्यायोगे वैदिक धर्माचे खरे स्वरूप जाणण्यास काही साधन राहिलेले नाही."
म्हणून शाहू महाराजांनी शंकराचार्य पिठाचे स्थान कोल्हापुरात असताना सुद्धा क्षात्रजगद्गुरु पदाची निर्मिती केली. या जगद्गुरुपदावर सदाशिवराव बेनाडीकर या मराठा व्यक्तीला बसवले. यांनीच पुढे शाहू वैदिक विद्यालयाचे काम चालवले. त्याचा जो जाहीरनामा, हुकूम काढलेला आहे तो मोठा आहे. त्याचा फक्त एन्ट्रो जसाच्या तसा इथे दिला आहे. सगळा जाहीरनामा तुम्हाला शाहू पेपर्स मध्ये वाचायला मिळेल. किंवा कोल्हापूर पुरालेखागारात ठराव बुकांमध्ये अस्सल हूकूम आहे. शाहू वैदिक विद्यालय हे ढोंगी ब्राह्मणी धर्माचे, सनातनी ब्राह्मणांचे, ब्राह्मण पुरहितांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी होते. त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिकून पुरोहित झाले ते सर्वच्या सर्व हे बहुजन समाजातील होते. त्यांची सगळी यादी त्या त्या वर्षीच्या अहवालामध्ये आहे. अभ्यासुनी ती जरूर पहावी. एवढेच नाही तर या वैदिक विद्यालयामधून शिकलेल्या व्यक्तींनी शाहू महाराजांचे अंत्यसंस्कार केले होते. आणि भारताच्या इतिहासामध्ये क्रांतिकारक ठरणारा शाहूपुत्र राजाराम महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा बहुजन मराठा समाजातील पुरोहितांनी केला. ते सुद्धा या वैदिक विद्यालयातील होते. ब्राह्मणी धर्माची मक्तेदारी मोडून काढायचं काम या वैदिक विद्यालयाने केलं होतं. जर राजर्षी शाहू महाराजांचं हे हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणी मक्तेदारी मोडून काढायचे हिंदुत्व ज्यांना मान्य असेल त्यांचे स्वागत आहे.
टीप - वरील परिच्छेदातील 'ढोंगी ब्राह्मणी धर्म ' हे शब्द राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे आहेत याची नोंद घ्यावी.
इंद्रजित सावंत
५-१-२०२२, कोल्हापूर.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा