लगेच २०२४ मध्ये होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल?
उद्धवसेना संपेल, असे ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी हा ऐतिहासिक दाखला.
अगदी असेच घडले होते १९६९ मध्ये.
तेव्हा कॉंग्रेसमधील काही मंडळींनी खुद्द इंदिरा गांधींचीच पक्षातून हकालपट्टी केली होती.
आमची कॉंग्रेस खरी, असे जाहीर केले होते. हकालपट्टी करणारे नेतेही छोटे नव्हते. मोरारजीभाई देसाई आणि कामराज असे तगडे नेते होते.
कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडली. इंदिरा गांधींकडे लाखो कार्यकर्ते होते, पण संघटना कॉंग्रेसकडे संख्याबळ होते. चार राज्यांत सरकार होते.
त्यानंतर दोनच वर्षांत निवडणुका झाल्या.
कॉंग्रेसचे 'बैलजोडी' हे लोकप्रिय चिन्ह मिळाले विरोधी गटाला. तर, इंदिरा गांधींनी गाय-वासरू या नव्या चिन्हावर निवडणूक लढवली.
पण, इंदिरा गांधींच्या या कॉंग्रेसने १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत ३५२ जागा जिंकून एकहाती विजय मिळवला. पुढे "खरीखुरी" कॉंग्रेस संपली आणि इंदिरांचीच कॉंग्रेस ही खरी कॉंग्रेस म्हणून अजिंक्य ठरली.
१९७७ मध्ये आणीबाणीनंतरही अनेक दिग्गज इंदिरा यांच्याविरोधात उभे ठाकले. पुन्हा कॉंग्रेस फुटली. त्यात देवराज अर्स, के. ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाणांसह अनेक नामवंत इंदिरांच्या विरोधात होते. इंदिरा गांधींना मूळ निवडणूक चिन्ह मिळाले नाही. तेव्हा त्यांनी 'हाताचा पंजा' हे निवडणूक चिन्ह निवडले. आणीबाणीनंतरची निवडणूक इंदिरा गांधी हरल्या, पण लगेच झालेल्या १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसचा हाताचा पंजा अजिंक्य ठरला. यशवंतरावांसह तमाम बंडखोरांना इंदिरा गांधींकडे यावे लागले किंवा गप्प घरी बसावे लागले.
इंदिरा म्हणजेच कॉंग्रेस यावर शिक्कामोर्तब झाले.
पक्ष ताब्यातून गेला अथवा निवडणूक चिन्ह गेले, म्हणून काही होत नसते.
यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे,
मुद्दा सात-बाराचा नसतो.
मुद्दा असतो, जनाधाराचा!
- संजय आवटे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा