II दुर्मिळ कॅमेरा ची माहिती II
(भाग- ३ रा)
काल आपण जगातील दुर्मिळ अश्या बॉडी कॅमेराची माहिती पाहिली. आजच्या तिसऱ्या पुष्पात आपण भारतीय बनावटीचा परंतु अतिशय वेगळ्या असा प्रोजेक्टरची माहिती पाहणार आहोत...
प्रकाशचित्रणकलेमध्ये महत्वाचा घटक असतो कॅमेरा. याच पद्धतीने चलचित्रात आवश्यक घटक असतो तो प्रोजेक्टर.
प्रकाशचित्रकलेचा शोधाच्या कित्येक वर्ष अगोदर प्रोजेक्टरचा शोध लागलेला होता. पूर्वी वीज अस्तित्वात नसल्यामुळे ते प्रोजेक्टर रॉकेलवर चालविले जात असत. काचेच्या तुकड्यावर हातानी सूक्ष्मपणे रंगविलेल्या स्लाईड्स लाकडाच्या चौकटीत बसवून या प्रोजेक्टरमध्ये वापरण्यात येत.अंधाऱ्या खोलीत समोरील मोठ्या पडद्यावर दिसणारे मोठ्या आकारातील चित्र त्या काळातील लोकांच्या दृष्टीने अतिशय कुतूहलाची गोष्ट होती आणि यावरूनच या प्रोजेक्टरला Magic Lantern म्हणजेच जादूचा दिवा हे नाव रुढ झाले.सुरुवातीला या प्रोजेक्टच्या लेन्सच्या बाजूस पितळी टेलिस्कोप बसविण्यात आला व मागील बाजूस असलेल्या छोट्या टाकीत रॉकेल वर चालणारे दिवा लावण्यात आला. या दिव्याच्या समोरील बाजू असलेल्या चौकोनी कप्प्यात स्लाईड्स टाकली असता समोरील पडद्यावर रंगीबेरंगी प्रतिमा दिसे.
डच शास्त्रज्ञ Christiaan Hujgens यांनी अतिशय प्रगत असा रॉकेलवर चालणारा प्रोजेक्टर बनवला आणि खऱ्या अर्थाने येथून प्रोजेक्टरच्या प्रगतीला सुरुवात झाली.त्यानंतर अनेक प्रयोगाद्वारे विविध प्रकारचे प्रोजेक्टर बनविले जाऊ लागले. आजही परदेशांमधील काही संग्रहालयात हे प्रोजेक्टर चांगल्या प्रकारे जतन करून ठेवलेले आहेत.
जसजसे प्रोजेक्टर प्रगत होत गेले तसतसे या प्रोजेक्टच्या स्लाईड्समध्ये सुद्धा बदल होत गेले, सुरुवातीला एका काचेवर एक चित्र या पद्धतीच्या स्लाईड अस्तित्वात आल्या, त्यानंतर आयताकृती काचेच्या पट्टीवर चार प्रतिमा असलेल्या स्लाईड्स बनवल्या गेल्या,या पद्धतीच्या स्लाईड्स मुळे एकावेळी चार चित्र समोरील पडद्यावर पाहता येऊ लागल्याने वेळेची बचत झाली. काही वर्षातच विविध चित्रांच्या हालचाली होणार्या स्लाईड्स अस्तित्वात आल्या, या स्लाईड्समध्ये दोन किंवा तीन काचांचा एकत्रित उपयोग करण्यात येत असे. पुढील काचेवर एखादे स्थिर चित्र व मागील काचेवर दुसरे चित्र रंगवलेले असे. त्यामुळे मागील स्लाईड पुढे मागे घेतल्यास समोरील पडद्यावर हालचाल दिसे.
प्रकाशचित्रकलेचा शोध लागल्यानंतर हातानी रंगवलेल्या स्लाईड्सची जागा फोटो स्लाईडसनी घेतली. परंतु त्या स्लाईड्स रंगीत नसून कृष्णधवल असत.
विजेचा शोध लागल्यानंतर या प्रोजेक्टमध्ये ६० Volt च्या पिवळ्या रंगातील बल्ब चा वापर होऊ लागला. कालांतराने काचेच्या स्लाईडची जागा प्लॅस्टिकच्या स्लाईड्सनी घेतली.
आपल्या देशामध्येसुद्धा या पद्धतीचे काही प्रयोग केले गेले. साधारण ६० ते ७० वर्षापूर्वी मेणबत्तीवर चालणारे प्रोजेक्टर अस्तित्वात आले.अल्पावधीतच संपूर्ण देशभर हे लोकप्रिय झाले,याच्या पुढील बाजूस "काका मिस्त्री" किंवा "बेबी जॉय" असे लिहिलेले असे. हा प्रोजेक्टर किती साली व कोणत्या ठिकाणी बनवला गेला याचे उल्लेख मात्र सापडत नाही. परंतु ज्या व्यक्तीने हे प्रोजेक्टर बनवले त्यांच्या कल्पकतेची खरोखर दाद द्यावी लागेल. भारतातील मेणबत्तीवर चाललेला हा पहिला प्रोजेक्टर असावा असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण आज पर्यंत तरी मेणबत्ती वर चालणारा प्रोजेक्टर माझ्या पाहण्यात किंवा संग्रहालयात पहावयास मिळाला नाही.
या प्रोजेक्टरचे वैशिष्ट्य म्हणजे हे आकाराने छोटे व वापरण्यास सोपे होते.
या प्रोजेक्टरच्या मागील बाजूस असणाऱ्या भागातील बॉक्समध्ये गोलाकार लाकूड लावत ज्यात मेणबत्ती लावण्याची सोय करण्यात आली होती. मेणबत्ती मुळे फिल्म ची मागील बाजू गरम नये म्हणून तिथे छोटा पंखा सुद्धा बसविण्यात आलेला होता.
अशा या मेणबत्ती वर चालणाऱ्या प्रोजेक्टरमध्ये साधारण तीन ते पाच मिनिटाची फिल्म बघता येत होती. परंतु त्या चलचित्राला आवाज मात्र नव्हता.
पुढे याच कंपनीने पिवळ्या बल्ब वर चालणारे प्रोजेक्टर बाजारात आणले त्याची रचना मेणबत्तीच्या प्रोजेक्टर सारखीच होती. या प्रोजेक्टर एक नकारात्मक भाग म्हणजे तो चालू केल्यानंतर थोड्या वेळातच प्रचंड गरम होत असे. त्यामुळे मध्ये मध्ये थोड्या वेळासाठी बंद करावा लागत असे.
आजही ज्येष्ठ व्यक्तींना हा प्रोजेक्टर नक्कीच आठवत असेल.
पुढे जरी चांगल्या दर्जाचे व महागडे प्रोजेक्टर अस्तित्वात आले तरी या मेणबत्ती व बल्ब वर चालणाऱ्या प्रोजेक्टची गंमत त्यात त्यात मुळीच नव्हती...
---------------------------------------श्री.अभिजीत धोत्रे,पुणे
मो: ९७३०४२८१८४
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा