ads header

संगीतसूर्य केशवराव भोसले म्हणजे तळपती तलवार : राजर्षी शाहू महाराज

" माझा केशा म्हणजे तळपती तलवार आहे " -  शाहू छत्रपती 
 आज संगीतसूर्य म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या केशवराव भोसले यांची जयंती. मराठी रंगभूमी ज्यांच्या मुळे अमूलाग्र बदलली, ज्यांच्या अवाजाची तुलना आजही कोणाशी होऊ शकत नाही असे हे केशवराव ! कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या संगीतातील सूर्याने आपल्या प्रतिभावान प्रभेने एकेकाळची मराठी रंगभूमी उजळून टाकली होती. 
     
   वयाच्या  पाचव्या सहाव्या वर्षीच रंगभूमीवर प्रकटलेल्या केशवरावांनी वयाच्या सतराव्या वर्षी स्वतःच्या ललितकलादर्श या नाटक कंपनीची स्थापना केली होती. ज्यावेळी नाटक कंपन्या राजाश्रयाशिवाय चालत नव्हत्या त्यावेळी केशवरावांच्या कंपनीने लोकाश्रया खालील असे बिरुद मिरवले आणि या सामान्य घरातील मराठा युवकाने ही कंपनी यशस्वीपणे चालवली. ती इतकी यशस्वी झाली की या नाटक कंपनीने आपल्या प्रयोगासाठी ये जा करण्यासाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केली होती. आनंदराव, बाबूराव या पेंटर बंधूनी रंगवलेला रंगपट आणि रंगमंचासमोरचा मखमली पडदा असा या लोकाश्रया खालील ललितकलादर्श कंपनीचा थाट होता.   
   
   केशवरावांच्या स्वाभिमानी स्वभावामुळे राजर्षीं शाहूंचे व त्यांचे काही काळ मतभेद झाले. करवीर राज्यात यायलाही त्यांना बंदी घातली गेली पण ज्या वेळी शाहूंनी कोल्हापुरात जागतिक दर्जाचे पॕलेस थिएटर नावाचे नाट्यगृह बांधले त्यावेळी सन१९१५/१६ मध्ये केशवरावांच्या नाटकानेच या नाट्यगृहाचे उद्धाटन केले. यावेळी शाहू छत्रपतींनी केशवरावांचा तब्बल दहा हजार रुपये बक्षीस देऊन सत्कारही केला. पुढे जेंव्हा शाहूंनी खासबाग कुस्ती मैदानात देशातील पहिला खुला रंगमंच तयार केला त्यावेळीही केशवरावांच्या नाटकानेच याचेही उद्घाटन केले. यावेळी मृच्छकटीक या संगीत नाटकाचा प्रयोग झाला. विशेष  म्हणजे हा नाट्यप्रयोग सर्व जनतेला मोफत होता. हा प्रयोग रात्री ९ ते पहाटे चार पर्यंत रंगला. तब्बल पंचवीस हजार लोक या वेळी हा प्रयोग पाहण्यासाठी हजर होते. केशवरावांच्या खड्या अवाजाने रसिक भारावले खासा छत्रपती घराण्यातील सर्व जनानाही या प्रयोगाला हजर होता.

    केशवराव भोसले मोठे दानशूर होते. त्यांनी कोल्हापुरात मोठा दानधर्म केला. अंबाबाईची शिखरे लक्ष दिव्यांनी पाजळली. तर कोल्हापूरच्या सर्व तालमींच्या वस्तादांचा बादली फेटे बांधून सत्कार केला. तालमींना भरगोस मदत केली.

  असे हे केशवराव स्वभावाने स्वतंत्र होते. त्यांनी त्यावेळी परदेशातून बुलेट मागवली होती. त्या बुलेटवर आपल्या पत्नीला घेऊन ते शहरातून फेरफटका मारत. तर राजर्षीं शाहूंनी त्यांना अंबारीसह हत्ती ही दिला होता. त्या हत्तीवर बसून केशवराव आपल्या मित्रांना घेऊन रंकाळा तलावा भोवती फिरती करत. एवढा मोठा गायक, कलाकार मित्रांच्या फर्माइशीवर अंबरीतच संगीताच्या ताना घेत असे. अशा केशवरावांबद्दल शाहू छत्रपतींना मोठा अभिमान वाटे ते म्हणत , "माझा केशा म्हणजे तळपती तलवार आहे. ती हातात धरली तर तुम्ही जग जिंकाल."

    केशवरावांचे निधन अवघ्या तिशीत झाले. पण फक्त तीन दशकांच्या आयुष्यात या संगीतसूर्यांने जो प्रकाश दिला तो आजही मराठी रंगभूमीवर पसरला आहे. केशवरावांचे आयुष्य एखाद्या अभिजात नाटकाप्रमाणे होते.

    अशा या संगीतसूर्यावर खूप लिहता बोलता येईल. आजच्या तरुणाईने राजकारण, मंडळ, उत्सव सोडून नाटक, संगीत, चित्रपट, खेळ, संशोधन अशी जीवनाची इतर क्षेत्रही आहेत. या क्षेत्रात ही भरपूर काम करता येते. हीच संगीतसूर्य केशवाराव भोसलेंच्या जीवनातून घ्यावयाची प्रेरणा आहे हे समजून घ्यावे.

इंद्रजित सावंत
९ अॉगस्ट २०२०
कोल्हापूर
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा