मराठा बांधवांनो चोरांना शिक्षा द्याच, मात्र संन्याशांना नको...
मराठा क्रांती मोर्चा हे मूक मोर्चे होते व संख्येच्या दबावापुढे सरकारला मराठा मागण्यांबाबत झुकावेच लागेल अशी परिस्थिती या ऐतिहासिक अभूतपूर्व आंदोलनामुळे निर्माण झाली होती.आंदोलन शांततेच्या मार्गाने असल्यामुळे ते दडपताही येत नव्हते.अशा परिस्थितीत मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये फूट पाडण्याशिवाय राज्यकर्त्यांकडे वेगळा पर्याय नव्हता.
याच पार्श्वभूमीवर आज ज्यांची दलाली चव्हाट्यावर आलेली आहे अशा आठ-दहा लोकांनी ठोक मोर्चाची भाषा करीत ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा आंदोलनास गालबोट लावले,फूट पाडली. अशा या मोजक्या लोकांच्या पुढाकारानेच परळीचे आंदोलन २०१८च्या जून मध्ये झाले.त्याचाच परिपाक म्हणून राज्यात हिंसाचार व ४२ आत्महत्या झाल्या.
ठोक मोर्चाची भाषा करणाऱ्या दहा वीस लोकांनी मुक मोर्चा आंदोलन वेठीस धरुन राज्यात आगडोंब पेटवणारी परिस्थिती निर्माण केली.ही बाब पूर्णतः सरकारच्या पथ्यावर पडली.त्यावेळी ठोकवाल्यानी हिंसक आंदोलन उभे करण्यासाठी काही नेत्यांची मदत घेत परळीत आंदोलन पुकारले. याच ठोक वाल्यांनी आंदोलन थांबविण्यासाठी सरकारकडे महामंडळे आणि पैशाची मागणी करणारी क्लिप व्हायरल झाली होती.या लोकांमुळे मुक मोर्चा बदनाम झाला. खरंतर मराठा क्रांती मूक मोर्चा अनेक प्रामाणिक समन्वयकांच्या कष्टातून योग्य दिशेने वाटचाल करीत होता. परळी ते आंदोलन पुकारून मराठा समाजाला उद्रेकाच्या दिशेने नेण्याचे षडयंत्र लक्षात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या प्रामाणिक समन्वयकांनी त्याचवेळी लातूरमध्ये अतिशय मोठी बैठक घेऊन हिंसा व उद्रेकाला विरोध केला होता.या बैठकीस किमान तीन ते चार हजार समाज बांधव उपस्थित होते.
ठोक वाल्यांना समाजास उद्रेकाच्या दिशेने न्यायचे होते,ते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य मागासवर्ग आयोगालाही विरोध करीत होते.आयोगाची गरजच नाही अशी बिनडोकपणाची त्यांची भाषा होती.मात्र मराठा क्रांती मूक मोर्चाचे पुरस्कर्ते यांनी पुढाकार घेऊन सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करायला लावली.यापूर्वीच्या आयोगांमध्ये मराठा विरोधक ठासून भरलेले असायचे,मात्र मराठा क्रांती मोर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आयोगात निष्पक्ष सदस्यांना समाविष्ट करण्यास मूक मोर्चाने सरकारला भाग पाडले.
म्हणून बांधवांनो आज जी दलालांची नावे पुढे आलेली आहेत, हे लोक मराठा क्रांती मूक मोर्चांमधून बाजूला होऊन ठोकची भाषा करणारेच आहेत.हे आपण सर्वांनी बारकाईने शोध घेतल्यास लक्षात येईल.
दलालांना उघडे पाडले गेलेच पाहिजे.मात्र संपूर्ण मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन व या आंदोलनात अहोरात्र प्रामाणिकपणे परिश्रम घेणारे अनेक समन्वयक यांना लक्ष करून चालणार नाही.चोरांना आणि संन्याशांना एकाच तराजूत मोजून कसे चालेल? सरसकट मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला दोष देणे थांबवा.आपण रचलेल्या इतिहासाला आपणच कलूशीत करू नका.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा