बस्तवडेच्या भूमीतील नररत्न कर्मवीर रावबहाद्दूर डी आर.भोसले
138 व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन.!
हो हे आपले सर्वांचे भाग्य आहे की पवित्र अशा वेदंगेच्या काठावर वसलेल्या या छोट्याशा बस्तवडे गावामध्ये अत्यंत कर्तृत्वान माणसे झाली.! यामध्ये कर्मवीर रावबहादूर डी.आर. भोसले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.!
डी. आर. अण्णा हे आपल्या बस्तवडे गावचे सुपुत्र आहेत असे म्हणण्यात देखील मोठा आनंद व अभिमान निश्चितपणे आहे.करवीर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर अण्णा यांचे दृढ संबंध असणे ही आपणा सर्वांसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.
नाशिक येथे जेव्हा छत्रपती शाहू महाराज कार्यक्रमासाठी गेले होते त्यावेळी तेथे फौजदार म्हणून अण्णा कार्यरत होते.मात्र शासकीय आदेश नसताना देखील ते शाहू महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून त्यांच्यावर सिन्नर येथे बदलीची कार्यवाही करण्यात आली. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजानी त्यांना पोरा असे का केलेस .? असे विचारले तेव्हा माय बापाना भेटायला यांच्या परवानगीची गरज काय.? असे उत्तर दिले त्यावेळी स्वतः शाहू महाराज राज्याच्या पोलिस महासंचालकाला त्यावेळी भेटले व त्यांची बदली रद्द केली. छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी त्यांच्यातील सामाजिक कार्याची आवड ओळखून त्यांना कोल्हापूर येथे आणून थेट शिक्षण खाते त्यांच्या ताब्यात दिले.अण्णांना संस्थांनचे एज्युकेशनल प्रोसेडिंग ऑफिसर केले.!
अण्णाना देखील शिक्षण खात्याची मोठी आवड होती. त्यांनी संस्थानात रुजू झाल्यावर जवळपास 400 शाळा होत्या तर या शाळांची संख्या संस्थांनचे शिक्षणाधिकारीपद सोडताना साडेसहाशेच्या वर केली.
घोडा गाडीची सोय असताना देखील ते बस्तवडे या गावी मतीवडे मार्गे चालत यायचे व लोकांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचे.आपल्या दोन्ही कोटाचे खिसे भरून गोळ्या व चॉकलेट आणायचे व ते सर्व शाळेतील मुलांना वाटायचे.!
मी कोणी तरी वेगळा आहे असे माझ्या या लोकांना वाटेल म्हणून मी गाडी न घेता चालत गावी येतो असे उत्तर ते कोणी विचारले की द्यायचे.शाळेत मुलांच्या विविध स्पर्धा पण घ्यायचे व त्यांना लगेच बक्षिसे पण द्यायचे...
आपल्या सर्वांचे दृष्टीने एक भाग्याची गोष्ट म्हणजे आपल्या *बस्तवडे गावच्या शाळेला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. 1971 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब माने हे स्वतः या कार्यक्रमाला गावी आले होते व याच कार्यक्रमांमध्ये शाळेस अण्णा यांचे नाव देण्यात आले होते.
प्राथमिक शिक्षकांवर आर्थिक छत्र धरणारी व तरीही बस्तवडे गावचा म्हणजे शाळेचा ज्या बँकेशी आजही फारसा संबंध नाही,किंबहुना गेल्या जून मध्येच बँकेच्या प्रचारावेळी कु. प्रज्ञा पाटील या गरजू मुलीला दै.पुढारी मधील वृत्तानुसार आर्थिक मदत करण्यासाठी आता सत्तेत आलेले शाहू आघाडीचे शिष्टमंडळ भेटले होते. त्यांनी शाळेस तसेच आदर्श शिक्षक हभप पां.रा.पाटील गुरुजी यांचीही भेट व आशीर्वाद घेतले होते,तेव्हा त्यांना अण्णा, बँक व बस्तवडे शाळेस अण्णांचे नाव या धाग्याची आठवण करून दिली व गावासाठी म्हणजे शाळेसाठी बँकेने काही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा शिक्षक नेते प्रमोद तौनदकर सर,सुनील पाटील सर व अन्य सहकाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अश्या प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना देखील 1939 मध्ये अण्णांनी केली.1993 मध्ये कोल्हापूर मध्ये याच बँकेने आपल्या दारात अण्णा यांचा पुतळा देखील उभा केला आहे. तत्कालीन जिल्हा बँकेचे चेअरमन आ.पी.एन. पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते.प्रतिवर्षी बँकेच्या अहवालात अण्णांचा फोटो व त्याखाली बस्तवडे ता.कागल असे छापले जाते. आज आपल्या बँकेचे संस्थापक असलेल्या आण्णा यांच्या जयंतीच्या व्यापक कार्यक्रमाची परंपरा बँकेत असेलही.!
त्याचबरोबर गव्हर्मेंट सर्व्हन्ट बँक, मराठा बँक यांच्या स्थापना देखील त्यांनीच केल्या. माझ्या दृष्टीने आनंद अभिमानाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्राच्या क्षेत्रात मी 21 वर्षे कार्यरत आहे तर कोल्हापूर प्रेस क्लबची स्थापना देखील अण्णांनी केले आहे.
नाशिक येथे कर्मवीर आण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1914 मध्ये स्थापन केलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या आज नाशिक जिल्ह्यात 496 शाखा आहेत.यामध्ये एकूण 2 लाख 14 हजार 813 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, एकूण 10 हजार 116 सेवक कार्यरत आहेत तर या संस्थेची एकूण उलाढाल 851 कोटीच्या आसपास आहे.संस्थेने कृतज्ञता म्हणून अन्य कर्मवीरांच्या सोबतींने अण्णांचा देखील फोटो तेथील कार्यालयात लावला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव शाळेस कर्मवीर डी आर आण्णा यांचे नाव देखील दिले आहे.या संस्थेच्या वार्षिक अंकामध्ये देखील अण्णांच्या वर लेख लिहिले आहेत.आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात अण्णा जाणीवपूर्वक नाशिक येथे गेले होते व त्यांनी हा संस्थेचा विस्तार अनुभवला होता.
या संस्थेचे एक शिष्टमंडळ गेल्या वर्षी आपल्या बस्तवडे गावी आले होते.अण्णांच्यावर माहिती संकलनाचे काम ते करीत होते. प्राचार्य डॉ.विलास पाटील यांनी देखील अण्णांच्या वर पुस्तक लिहिले आहे. पन्हाळ्यावरील दोन बंगले त्यांनी विद्यार्थी वस्तीगृहास दान दिले आहेत.इंग्लड मधील स्काऊट मेळाव्यास देखील आण्णा 1940 मध्ये उपस्थित होते.
बस्तवडे गावामध्ये 1984 मध्ये कै. विक्रमसिंह राजे घाटगे यांनी भव्य व्यायाम शाळा उभारून त्यास राव डी. आर.भोसले स्मृती मंदिर असे नाव देण्यात आले तशी संगमरवरी पाटी देखील या इमारतीवर आहे. याबरोबरच 1999 मध्ये कर्मवीर डी आर भोसले तरुण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.तर प्राथमिक शाळेच्या निमित्ताने अण्णांचे जिवंत स्मारक उभे आहे.
त्यांचे मोठेपण हे की,
अण्णांनी एवढा सहकाराचा किंवा संस्थांचा विस्तार करताना त्यात इतका निरपेक्ष भाव जपला की शक्य असताना देखील अण्णांनी कधीही त्यात वारश्याची सोय करून ठेवली नाही. अश्या या त्यागी समर्पित व सेवाभावी व्यक्तिमत्वास आज दि 11 सप्टेंबर 2022 रोजी 138 व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन..!
साभार
---मधुकर भोसले----
प्रतिनिधी दै.पुढारी
बस्तवडे ता कागल
11/9/2022
#बस्तवडे, #नररत्न, #कर्मवीर #रावबहाद्दूर #डी #आर.#भोसले, #शिक्षण, #शाहू #महाराज, #नाशिक, #कोल्हापूर, #बडोदा #अमरसिंह #राजे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा