ads header

उपमुख्यमंत्री फडणविसांनी मराठ्यांना आरक्षण देऊन फसवले! पण संभाजीराजे व मेटे यांनी त्यांना साथ का दिली?- शिवाजी कवठेकर

उपमुख्यमंत्री फडणविसांनी मराठ्यांना आरक्षण देऊन फसवले! पण संभाजीराजे व मेटे यांनी त्यांना साथ का दिली?- शिवाजी कवठेकर 
बीड दि.3(प्रतिनिधी) दोन हजार अठरा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना 50 टक्‍क्‍यांच्या वरचे आरक्षण देऊन फसवले होते, हे आता कायदेशीर अर्थाने स्पष्ट झाले आहे. पण त्यावेळी खासदार असलेले संभाजीराजे व आमदार असलेले विनायक मेटे हे दोघे, आणि क्रांती मोर्चा चे काही समन्वयक एवढेच लोकं मराठा समाजाचे नेते व प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात होते. मराठा समाजाने विश्वास टाकलेल्या संभाजीराजे व मेटे यांनी मराठ्यांना कायदेशीरदृष्ट्या फसवण्याच्या या न्यायालयीन षडयंत्रात फडणवीसांना साथ का दिली?याचे उत्तर मिळायला पाहिजे, असे दोनशे दिवसांपासून (12 डिसेंबर 2021) ओबीसी आरक्षण दुरुस्तीसाठी आंदोलन करत असलेल्या, आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
                         पत्रकात पुढे म्हटले आहे की, पन्नास टक्क्यांच्या वरचे आरक्षण भारतात देता येत नाही, हे फडणवीस यांना माहीत होते. पण तरीही, त्यांनी ते मराठा समाजाला देऊन फसवले होते.कारण फडणवीसांच्या भाजप या पक्षाला मराठा समाजाचे मतदान पाहिजे होते. म्हणून फडणवीस तसे वागले होते. पण मराठा महासंघाच्या स्थापनेपासून, व स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या सहवासात राहिलेल्या आणि पाच वेळा विधानपरिषद सदस्य झालेल्या विनायक मेटे यांना, व 15 -16 वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार असलेल्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असलेले 50 टक्‍क्‍यांच्या वरचं आरक्षण हे बेकायदेशीर आहे ; आणि जरी दिले तरी न्यायालयात ते टिकणार नाही; पण तरीही ते न टिकणारे आरक्षण देऊन ते मराठा समाजाला फसवत आहेत, हे कळत नव्हते? हे सगळं मराठा समाजाच्या या दोन्ही नेत्यांवरील असलेल्या विश्वासार्हतेला प्रश्नांकित करणारे आहे. शिवाय, इतक्या दीर्घ काळापासून आंदोलन करत असलेल्या उभय नेत्यांना स्पष्ट असलेला कायदा कळत नव्हता, असे समजायचे का? मग तर यांच्या नेतृत्व क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. कारण नेतृत्व करणे हे साध्याभोळ्या माणसाचे काम तर निश्चितच नाही. आणि हे दोघेही तर सर्वसामान्यपणे राजकीयदृष्ट्या बुद्धिमान असल्यासारखेच भासतात.पण त्यांना मराठा आरक्षणात काही स्वारस्य असल्याचे दिसत नाही.कारण, या दोघांनाही भविष्यात निवडणुकीचे राजकारणच करायचे आहे.त्याकरिता संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे ; तर आ.विनायक मेटे यांना बीड नगरपालिका जिंकून, आपल्या विधानसभा मतदारसंघात आपल्या शिवसंग्राम या संघटनेचे स्थान निर्माण करायचे आहे.म्हणजे हे दोघेही हुशार व विद्वान आहेत, हे कळण्यासाठी इतर कोणत्याही पुराव्याची गरज नाही. पण फडणवीस मराठयांना पन्नास टक्क्यांच्या वरचे आरक्षण देऊन फसवत असताना, या दोघांनीही फडणवीस यांना का थांबवले नाही? फडणवीसांना कोणत्या कारणासाठी साथ दिली?याचा खुलासा समाजाकडे दोघांनीही करायला पाहिजे.कारण, आरक्षण मिळविण्यासाठी क्रांती मोर्चाने विराट 52 मोर्चे काढले होते, तर 42 तरुणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.खुप प्रक्षोभक वातावरण त्यावेळी राज्यात असताना मुख्यमंत्री फडणवीस मराठयांना फसवत होते,आणि समाजाने विश्वास टाकलेले हे दोन्ही नेते, मूकपणे फडणावीसांना साथ देत होते, हे खूपच धक्कादायक आहे.म्हणून, आमची आरक्षण बचाव आंदोलन समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळावर मराठा समाजाला फसवल्याबद्दल 420 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.व या याचिकेच्या माध्यमातून सह आरोपी कोणाला करावे? याची विचारणा संभाजीराजे व मेटे यांना करावी अशी विनंती न्यायालयाकडे करणार आहे.शिवाय, न्यायमूर्ती गायकवाड आयोग व ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना साक्षीदार होण्याचा आदेश द्यावा! अशी मागणी करणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकातून शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा