संपूर्ण महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व म्हणजेच कै. आर आर पाटील यांचे धाकटे बंधू अर्थात आर आर पाटील हे नुकतेच करवीर पोलिस उपअधीक्षक पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सर्वजण परिचित आहेतच त्यामुळे यावर फारसं बोलण्याऐवजी मी त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर बोलू इच्छितो.. हा प्रसंग तास भावनिक आहेच पण तो तुमच्या समोर कधीच आला नाही..
आर आर पाटील म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आबा आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. आबांच्या वडिलांचा मृत्यू 1975 च्या आसपास झाला आणि यानंतर थोरले बंधू म्हणून आबांच्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. आबा आणि त्यांचे दोन्ही धाकटे बंधू शिक्षणात हुशार होते मात्र आर्थिक परिस्थितीमुळे या तिन्ही भावंडांच्या शिक्षणात अनेक अडचणी येऊ लागल्या. तुटपुंजी शेती आणि एक म्हैस यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. या तुटपुंज्या उत्पन्नातून ना कौटुंबिक खर्च भागात होता ना या तिघांचा शैक्षणिक खर्च.. त्यामुळे या कुटुंबाची खूपच तारेवरची कसरत सुरू होती. आबांना वकील व्हायचं होतं. वडिलांची कपडे अल्टर करून ती परिधान करून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. याच प्रतिकूल परिस्थितीत आर आर पाटील यांचे धाकटे बंधू म्हणजेच आर आर पाटील ज्यांना आपण सर्व प्रेमाने तात्या म्हणतो त्यांना पोट दुखीचा त्रास सुरू झाला. खूप औषधे झाली मात्र गुण काही येत नव्हता. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मोठा डॉक्टर परवडत नव्हता. तात्यांच्या पोटातील वेदना थांबायचे नावच घेत नव्हत्या. मग मोठ्या डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. निकटवर्तीयांच्या सल्ल्याने एका डॉक्टरची भेट घेतली या डॉक्टरांनी तात्यांची पूर्ण तपासणी करुन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.. ऑपरेशनचा त्यावेळचा खर्च होता रुपये दहा हजार... ही रक्कम या कुटुंबाला उभी करणं शक्यच नव्हतं. काय करायचं? असा प्रश्न या कुटुंबसमोर उभा राहिला होता. तात्यांच्या पोटातील वेदना काहीतरी गंभीर घटनेचे संकेत देत होत्या. अखेर आबांनी आणि त्यांच्या आईने आपली दुभती म्हैस विकण्याचा निर्णय घेतला. ज्या म्हैशीवर आबांच्या आणि तात्यांच्या घरचा उदरनिर्वाह आणि शिक्षण सुरू होते ती म्हैस विकण्याचा निर्णय तात्यांना मान्य नव्हता. ही म्हैस विकल्यानंतर आबांचे शिक्षण निम्म्यावरच थांबणार होते याची जाण तात्यांना होती. माझं काय व्हायचं ते होऊ दया, पण ही म्हैस विकायची नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. पण तात्यांच्या ऑपरेशनसाठी ती म्हैस विकायचीच भलेही आपले शिक्षण थांबले तरी चालेल, असा हट्ट आबांनी आपल्या धाकट्या भावासाठी घेतला होता. आबांचे शिक्षण पूर्ण झाले की आबा आपल्या घरची ही गरिबी दूर करतील असा विश्वास तात्यांना होता. म्हणून तात्यांनी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला ते एक दिवस कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. कालांतराने सर्व परिस्थिती बदलली होती. पण या दोन भावांचा एकमेकांसाठीचा त्याग अध्यापही महाराष्ट्राला ठाऊक नाही. हे दोन्ही भाऊ मोठ्या पदांवर होते पण आपण भोगलेल्या परिस्थितीमुळे पदांवर असूनसुद्धा त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते आणि आहेत.
बस्स... फार काही लिहायचं नाही !!
©अमोल शिंगे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा