जालना पोलीस अधीक्षकांना पुजा मोरे अटक प्रकरणी चौकशी करण्याचे मानवाधिकार आयोगाचे निर्देश
सोलापूर -: पुजा मोरे या युवतीला बेकायदेशीरपणे अटक केल्या प्रकरणी छावाचे योगेश पवार यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दि. 08/03/2021 रोजी मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष तथा सदस्य माननीय एम. ए. सईद यांचेसमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी तक्रारदार योगेश पवार यांनी पोस्टाव्दारे दाखल केलेले विडिओ पुरावे, कागदपत्रे व लेखी म्हणणे याचा विचार करून माननीय एम. ए. सईद यांनी जालना पोलीस अधीक्षक यांना स्वतंत्र, निःपक्षपाती चौकशी करून स्पष्टीकरण व तपशील अहवाल देण्याचे निर्देश दिले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की.,
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवेळी राजुर-जालना रोडवरील समृद्धी महामार्ग पुलावरून मुख्यमंत्र्याचा ताफा अडवून लोकशाही मार्गाने निषेध नोंदवून, मुख्यमंत्री गो बॅकच्या घोषणा देत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे हिला जालन्यातील सिव्हिल ड्रेसमधील 4-5 पुरुष पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून चुकीच्या पध्दतीने अटक केली. तसेच फक्त पुरुष पोलीस असलेल्याच पोलीस गाडीत पुजा मोरेला बसवले. पोलीस गाडीत बसून पुजा मोरे ही मुख्यमंत्र्याच्या विरोधात घोषणा देत असताना पुन्हा सिव्हिल ड्रेसमधील एका पुरुष पोलिसांने पुजा मोरे हीचे नाक व तोंड दाबले. सदर घडलेला घटनेतून जालना पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या गोंडस नावाखाली पुजा मोरे हिचा एक प्रकारे विनयभंग केला होता. तसेच जालना पोलिसांनी एका मुलीला, पूरूष पोलीसांकडून अटक करून, तिच्या शरीराला चुकीच्या पध्दतीने हात लावून व नाक-तोंड दाबून सर्व पुरुष पोलीस बसलेल्या गाडीत पुजा मोरे युवतीला आत टाकून संबंधित पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन व आदेशाचा भंग केला म्हणून राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांना पुजा मोरे अटक प्रकरणी स्वतंत्र, निःपक्षपाती चौकशी करून स्पष्टीकरण व तपशील अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष तथा सदस्य माननीय एम. ए. सईद यांनी दि. 08/03/2021 रोजी दिले आहेत.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा