फिरंगोजी शिंदे जर धारतीर्थ पडले नसते तर इतिहास वेगळा घडला असता...
फिरंगोजी शिंदे यांचा रक्तरंजित इतिहास...
#Amhi Kolhapuri
#जुना राजवाड्यातील १८५७ #कोल्हापूर रक्तरंजित क्रांती
५ डिसेंबर१८५७ दिनविशेष
कोल्हापूर राज्य
रक्तरंजित क्रांती
१८५७ च्या भारतातील उठावाला इंग्रजांनी "शिपायांचे बंड" म्हणले असले तरी त्या उठावाला शिपायातील असंतोष एवढेच कारण देशव्यापी लढ्याला नव्हते. या उठावाला स्वातंत्र्याचे युद्ध असेही म्हणले गेले यात फक्त असंतुष्ट शिपाईच नाही तर समाजाच्या सर्व स्तरातील लोक सामील होते. ते एक लोकयुद्ध होते. १८५७ ला उत्तर हिंदुस्थानातच ब्रिटिशांविरुद्ध उठाव झाला आणि दक्षिणेकडे त्याचा आवाज उठला नाही अस नाही. महाराष्ट्रात #कोल्हापूर आणि #सातारा राज्यांत उठावाचे स्वरूप तीव्र होते. सातारकर छत्रपती प्रतापसिहं महाराज व त्यांच्या अभिमानी मंडळींनीं ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची जोरदार तयारी चालवली होती त्याला महाराष्ट्रातील सरदार, संस्थानिकांनी साथ दिली. याकाळात कोल्हापुरात शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचे राज्य होते. राज्य महाराजांचे सत्ता मात्र इंग्रजांची अशी काहीशी परिस्थिती सातारा व कोल्हापूर राज्यात होती. बाबासाहेब महाराजांचे धाकटे बंधू शाहू उर्फ चिमासाहेब महाराज यांनी स्वतः पुढाकार घेऊन १८५७ सालीचा ब्रिटींशांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी चालवली होती. १८५७ साली कोल्हापुरात जो काय पाच महिने संघर्ष झाला त्याचे $सूत्रधार चिमासाहेब महाराजच होते.
चिमासाहेब महाराज
शाहू उर्फ चिमासाहेब महाराज हे शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांचे द्वितीय पुत्र. त्यांचा जन्म ८ जानेवारी १८३१ रोजी झाला. नर्मदाबाई या चिमासाहेब महाराजांच्या मातोश्री. १८४४ च्या गडकऱ्यांच्या बंडाचा त्यांच्या मनावर विशेष परिणाम झाला होता त्यांचे वय त्यावेळी अवघे १३ वर्ष होते "बाहेरच्यांना येऊन आपला राज्यकारभार चालवावा आणि आपण ते मुकाट्याने पाहत बसावे हे आपणास पसंत नाही असे ते बोलून दाखवू लागले". चिमासाहेब महाराज शूर, सशक्त आणि देखणे होते. वडिलांप्रमाणेच घोडेस्वारीत ते पटाईत होते घोड्यावरून भाल्याने शिकार करण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. ते लाठी, वोथाटी हि खेळत ते वारंवार शिकारीस जात त्यामुळे विविध थरातील लोकांचा त्यांच्याशी संपर्क येत. त्यांना राज्यातील प्रदेशाचीही उत्तम माहिती झाली होती. १८४१ सालापासून या राजपुत्रांच्या शिक्षणाची व्यवस्था इंग्रज सरकारच्या सल्ल्यावरून करण्यात आली होती. एकदा पोलिटिकल सुप्रीटेंडेंटनी दोघा राजपुत्रांचा अभ्यास कसा चालला आहे यासाठी भेट दिली व दोघांची बुद्धिमत्ता पाहावी म्हणून प्रश्न केला "या हत्तीवरून वाजवल्या जाणाऱ्या नौबतिचा आवाज कोठपर्यंत ऐकू जाईल?" बाबासाहेब महाराजांनी उत्तर दिले टेंबलाई च्या टेकडीपर्यंत. चिमासाहेब महाराजांचे उत्तर होते "आमच्या हत्तीवरील नौबतिचा आवाज वारणेपासून तुंगभद्रेपर्यंत पोहचतो" हे उत्तर ऐकून सुप्रिटेंडला कळाले हे पाणी वेगळेच आहे.
विवाहानंतर चिमासाहेब महाराजांना नोकरवर्ग वाढविण्यास परवानगी मिळाली. याचा फायदा घेऊन त्यांनी आपले सहकारी निवडले. रामसिंग परदेशी, आण्णा फडणीस, फिरंगोजी शिंदे, बापूजी साळोखे, बाळासाहेब निंबाळकर, दौलतराव व हंबीरराव मोहिते, हि प्रमुख लोक याशिवाय २७ व्या फलटणीतील बापू शिंदे, रामजी शिरसाट, महादेव चव्हाण, शिव सावंत हि मंडळी होती. चिमासाहेब महाराजांना मातृ-पितृ शोक लहानपणीच झाला त्यांचा सांभाळ ताराबाई राणीसाहेब करत असल्या तरी त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण केली ती सईबाई उर्फ दिवाणसाहेब यांनी.
उठावाची तयारी
चिमासाहेब महाराजांनी कोल्हापुरात उठाव करण्याच्या दृष्टीने राज्याच्या लष्करात सैन्यभरती आणि ब्रिटिशांच्या फलटणीत फितुरी करण्यास सुरुवात केली. कोल्हापूरच्या लष्करातील रेड रिसालयातील प्रमुख बापूजी साळोखे चिमासाहेब महाराजांच्या जवळचा होता त्याने प्रत्येक स्वराकडून "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या सरंक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी कुलस्वामिनीला स्मरून अशी शपथ घेतो कि मी देशातून व राज्यातून इंग्रजांना घालवून दिल्याशिवाय शस्त्र खाली ठेवणार नाही, यापुढे मी चिमासाहेब महाराजांचा सेवक म्हणून काम करीन" हि शपथ घेतली.
कोल्हापुरात त्यावेळी इंग्रजांची २७ वी स्थानिक फलटण होती. हि फलटण फितूर करण्यासाठी महाराजांनी माणसे नेमली, धारवाड, बेळगाव व बंगालमधील फलटणींशी संधान जोडले. कोणत्या विभागात कोणी नेतृत्व करायचे, संदेशवाहकाचे काम, घडणाऱ्या घटनांची नोंद आणि पुढील धोरणाचा कोठे विचार करायचा याची महाराजांनी आखणी केली होती. यासाठी चिमासाहेब महाराजांनी कोटितीर्थच्या बागेची निवड केली होती. या बागेतच सर्व गुप्त मसलती चालत. यानंतर चिमासाहेब महाराजांना उत्तरेतून एक व्यक्ती भेटल्याचा उल्लेख सरकारी कागदपत्रात आढळतो ते म्हणजे जोतिराम उर्फ भाऊसाहेब घाटगे यांना लखनौ वरून नानासाहेब पेशव्यांनी चांदीची मूठ बसविलेली रत्नजडित तलवार आणि त्यांचे पत्र असलेली थैली दिली. चिमासाहेब महाराजांनी सार्वत्रिक उठावाचा दिवस १७ ऑगस्ट ठरवला होता पण रामजी शिरसाट यांनी १ जुलै ला इंग्रज अधिकाऱ्यांना व सैनिकांना सोळांकूर येथे पाठलाग करून ठार केले यामुळे कोल्हापूरला ज्यादा लष्कर व अधिकारी पाठवले. यानंतर अनेकांना पकडून फाशी दिली, तोफेच्या तोंडी दिले. यानंतर चिमासाहेब महाराजांच्या सर्व हालचालीवर सतत नजर ठेवली जाऊ लागली इंग्रजांनी आपले हेर राजवाड्यात नेमले जे सगळी माहिती पोलिटिकल सुपरिटेंडेन्टल देत होते. अशा एका हेरांची हत्या केली त्याचे प्रेत राजवाड्यात पहाताच कर्नल जेकब ने महाराजांच्या विश्वासातील सर्व नोकरांना काढून टाकले तसेच सर्वांवर निर्बंध आणून चिमासाहेब महाराजांना राजवाडा सोडून बाहेर न जाण्याचे फर्मान दिले. सर्व राजघराण्यालाच नजरकैदेत ठेवले. महाराजांची बाजू घेऊन इंग्रजांना विरोध करणाऱ्या सरदार, मानकऱ्यांना त्यांची वतने काढून घेण्याच्या धमक्या दिल्या. १८५७ च्या देशव्यापी उठावाची सुरुवात झाल्यावर इंग्रजांनी कोल्हापुरात कडेकोट लष्करी बंदोबस्त ठेवला. राजवाड्यावर ताबा घेतल्यावर इंग्रजांनी चिमासाहेब महाराजांच्या विश्वासू लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यात त्यांनी रामसिंग परदेशी व भाऊसाहेब घाटगे यांना पळून जाताना गोळीबारात ठार केले. आण्णा फडणीस ने काही केल्या तोंड न उघडल्याने त्यांना जन्मठेप दिली.
चिमासाहेब महाराजांना राजवाड्यातच बंदी केले असतानाच दौलतराव व हैबतराव मोहिते हे हि पकडले गेले या दोघांचेही अतोनात हाल केले पण त्यांनी हि काही न सांगितल्याने इंग्रजांनी दोघांना फाशी दिली. या सगळ्यात फिरंगोजी शिंदे व बापू साळोखे हे दोघेच बाहेर होते. गावोगावचे लोक त्यांना इंग्रजांवर हल्ला कधी करायचा हे विचारात होते पण #चिमासाहेब महाराज बंदिवासात अडकल्यामुळे कोणतीच योजना पार पडत येत नव्हती. अखेर फिरंगोजी शिंदे यांनी एक धाडसी योजना आखली. कोल्हापूर राज्यात ठरलेल्या दिवशी सार्वत्रिक उठाव न करता चिमासाहेब महाराजांना सोडवून तटाबाहेर आणायचे व तेथून बापू साळोखे त्यांना घेउवून अज्ञातस्थळी जातील. हल्ल्याची तारीख ५ डिसेंबर १८५७ ठरविण्यात आली.
#५ डिसेंबर १८५७
मुख्य कोल्हापूर तटबंदीच्या आत वसले होते सभोवती सुमारे पावणे दोन मैलांची वर्तुळाकार तटबंदी होती. तटबंदीची उंची साधारणतः ३० फूट, ठराविक अंतरावर ४५ बुरुज. शहरात प्रवेश करण्यासाठी गंगावेश, रविवार वेश, वरुणतीर्थ वेश, शनिवार वेश, मंगळवार वेश आणि रंकाळा वेश अशा ६ वेशी होत्या. सर्व वेशींना बळकटी लाकडी दरवाजे व हत्तीपासून सरंक्षणासाठी जाड, लांब अनुकचीदार खिळे होते. #राजवाडा (सध्याचा #जुना राजवाडा) शहराच्या मध्यभागी असून मुख्य इमारत तीन मजली होती यात सुमारे २०० प्रशस्त खोल्या होत्या. वाड्यात सुमारे ८ प्रशस्त चौक होते तेथे कडेकोट बंदोबस्त होता तसेच राजवाड्याबाहेरही कडेकोट बंदोबस्त होता. ५ डिसेंबर रोजी फिरगोंजी शिंदे आपल्या निवडक सैन्यासह तटावरून आत घुसले. आडवे येतील ते पहारे कापत संबंध शहराचा ताबा घेतला. प्रतिकार करणार्यांना ठार मारले बाकीच्यांना कोंडून घातले यामुळे गोंधळ उडाला व पळापळ सुरु झाली या गडबडीत एक इंग्रज सैनिक लपून बसला फिरंगोजी शिंदे सगळं निवळलं या भावात महाराजांना शोधू लागले तेव्हा लपून बसलेल्या सैनिकाने फिरंगोजी शिंदेंना गोळी घातली त्यात ते मृत्युमुखी पडले यामुळे चिमासाहेब महाराजांसमोर पेचप्रसंग उभा राहिला बाहेर जाऊन पकडले गेलो तर सगळे प्रयत्न फसतील तोवर कर्नल जेकब फौज घेऊन शहरावर चालून आला व शनिवार वेस तोफा लावून उडवून आत प्रवेश केला दिसेल त्या माणसाची कत्तल केली कित्येकांना पकडून तोफेच्या तोंडी दिले. फिरंगोजींनी हल्ला केला त्यावेळी १००० सैनिक पहार्यावर होते तसेच जेकब ५००० ची फौज घेऊन बंदोबस्तासाठी आला होता यात ५०० लोकांसहित केलेलं फिरंगोजींचं धाडस हिंदुस्थानातील इतरत्र झालेल्या उठावांपेक्षा काहीच कमी नव्हतं. फिरंगोजींना जरी अपयश आलं नाही तर इतिहास निराळाच लिहिला गेला असता. या हल्ल्यात भाग घेतलेल्या एकही सैनिकाला इंग्रजांनी जिवंत सोडले नाही.
कर्नल जेकब ने वाड्यात महाराजांना पाहताच #"We are saved, he is there " असे उद्गगार काढले. यानंतर चिमासाहेब महाराजांना साधा पोशाख देण्यात आला. त्यांना मेण्यात बसवून रत्नागिरीत नेण्यात आले तेथून कराचीला पाठविले व तिथे बंदिवासात ठेवण्यात आले. चिमासाहेब महाराज कराचीला बंदिवासातले पहिले स्वातंत्र्यवीर होत. १८५९ ला कराचीत "पॉईंट मनोरा" येथे ठेवण्यात आले पुढे त्यांना एक बंगला बांधून देण्यात आला. चिमासाहेब महाराजांनी सुमारे ११ वर्षे बंदिवासात काढली त्यांचे १८६९ साली निधन झाले.
इंग्रजांच्या दृष्टीने या बंडखोर ठरलेल्या स्वातंत्र्य वीरांच्या कार्यासंबंधीचे कागदपत्रे कोणी जवळ ठेवली नाहीत. बऱ्याचशा कागद पात्रांचा नाश केला गेला. इंग्रजांच्या दहशतीमुळे त्यांच्याशी संबंधित आलेल्या लोकांनीही आपणास काही माहिती नाही अशी वागणूक ठेवली यामुळे यांचे पराक्रम झाकोळले गेले. कोल्हापूर राज्याचा जुना इतिहास व मुंबई सरकारच्या काळातील काही फाईली, बाँम्बे गँझिटर मधून याचे उल्लेख मिळतात.
कोल्हापूरच्या राजवाड्याच्या परिसराला रक्तरंजित इतिहास आहे या युद्धात वीरमरण आलेल्या फिरंगोजी शिंदे व त्यांच्या साथीदारांना विनम्र अभिवादन...
सुशांत सतीश हराळे
#५डिसेंबर१८५७
#कोल्हापूर_राज्य
#रक्तरंजितक्रांती
#सेनानी_फिरंगोजीशिंदे_सेना
#क्रांतिवीर_चिमासाहेब_महाराज
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा