✒️लेख : व्यक्ती विशेष
शेकडो महिलांची जीवनज्योत प्रज्वलित करणारी आधुनिक अहिल्यादेवी म्हणजे रेश्मा सावंत !
पुणे : जीवनातील वाटेवरून चालतांना अनेक खाच खळगे लागतात. अशाच एका वळणावर श्रीमती रेश्मा सावंत यांचे पती सोबतचे वैवाहिक संबंध संपले. वैवाहिक जीवनातील अतोनात छळातून मुक्तता तर झाली. पण घटस्फोटित महिलांच्या जगण्याचा प्रश्न आ वासून ठाकला होता. पुढे काय ? हाच एक मोठ्ठा प्रश्न होता. आई-वडिलांची साथ तर आहेच पण अजून किती दिवस आपला भार ते वाहणार याची चिंता रेश्मा यांना सतावत होती. शिक्षण अपुरे त्यातून मिळणारी नोकरी आणि पोटच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी येणारा खर्च याचा कुठेच मेळ लागत नव्हता. जगणं तर जगावंच लागणार होतं...भरीसभर कोर्टकचेरीच्या फेऱ्या. नटसम्राट नाटकातील स्वगतासम "To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग.." अवस्था झाली होती.
अशावेळी वडिलांनी साथ दिली. आईने सावरलं आणि भावाने तारलं !
महिलांच्या जीवनात स्थैर्य आणणारा कोर्स म्हणजे शिवणक्लास. तो कोर्स करण्याचे रेश्मा यांनी ठरवलं. कोर्स पूर्ण केला. कपडे शिवू लागल्या... एक एक म्हणता ब्लाऊज पीस शिवता शिवता...लहान लहान मुलींची आकर्षक फॅशनेबल ड्रेस शिवून त्या देऊ लागल्या आणि दोन-एक वर्षात फॅशनेबल ड्रेस डिझायनर म्हणून नावलौकिक मिळवला. खर्चाला चार पैसे हातात राहू लागले होते. काम तर वाढलं होतं. एकटीला आवरत नाही म्हणून त्यांनी हाताखाली एक सहाय्यक घेतली. तीला शिवणावळ शिकवली. तीही चांगल्या प्रकारे कपडे शिवू लागली. तीने रेश्मा यांच्या हाताखाली काम करणे सोडून दिले आणि स्वतःच मशीन घेऊन कपडे शिवू लागली. पुन्हा एकदा रेश्मा यांनी नविन सहाय्यक हाताखाली ठेवली. तीला सुद्धा शिकवलं. तीने सुद्धा स्वतःचे दुकान सुरू केले आणि स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. असं पुन्हा पुन्हा होऊ लागलं तेंव्हा रेश्मा यांच्या धाकट्या बहीणेने रेश्मा यांना इन्स्टिट्यूट काढण्यासाठी उद्युक्त केले.
आत्ता पर्यंतच्या अनुभवांवरून रेश्मा यांना स्वामींचा आदेश मिळालाच होता. त्यांच्या कडे येणारी प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी ठाकली होती. स्वतंत्रपणे ह्या स्त्रीया आर्थिक स्वातंत्र्य जगत होत्या. कदाचित हाच दैवी संकेत स्वामींचा आदेश असेल म्हणून पैशाची जुळवाजुळव करून ऑफिस भाड्याने घेतले आणि अंबिका फॅशन अँड बुटीक इन्स्टिट्यूटची स्थापना केली. इन्स्टिट्यूटची तर सुरुवात झाली, पण प्रमाणिकरणाचा प्रश्न उपस्थित झाला. तो ही प्रश्न बहिणीच्या मित्राने चुटकीसरशी सोडवला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील "अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एंड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट®" या स्वायत्त सामाजिक संस्थेशी संलग्नित केले. संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी आखून दिलेल्या मार्गदर्शनाखाली अंबिका फॅशन अँड बुटीक इन्स्टिट्यूट प्रगती करू लागली.
त्यात खंड पडला तो कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे. कोरोनाने सर्वसामन्यांचे जगणे बेहाल केले. उतारवरच्या गाडीला एकदम करकचून ब्रेक लागावा असे रेश्मा यांचे झाले. पण म्हणतात ना... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे!
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे रेश्मा यांनी जग जिंकण्यासाठी पुन्हा झेप घेतली आणि ह्याच महिन्यातील ५ तारखेच्या शुभ मुहूर्तावर दोन ब्रॅंचेसचे वडील श्री अशोक सावंत यांचे हस्ते उद्घाघटन केलें. ह्या कार्यक्रमाला आणि रेश्मा यांना प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, वृषाली ताई कामटे, शितलताई सुरवसे, अश्विनीताई कदम, माहुरगड बचत गटाच्या सर्व महिलानी उपस्थिती नोंदवून पाठिंबा दिला.
रेश्मा यांनी आत्ता पर्यंत शेकडो महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. त्यांना शक्य होईल ती सर्व मदत केली आहे. स्वतःचे दुकान ते इन्स्टिट्यूट आणि ब्रॅंचेस हा प्रवास खूप खडतर होता. पुण्यात राहून पुणेकरांनी एकट्या स्त्रीला कधी स्वीकारले आहे असे कधी झाले आहे का ? जगद्गुरू आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जो छळ झाला. त्याच प्रमाणे रेश्मा यांना पण जगनिंदेला सामोरे जावे लागले. ह्या अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखूण तयार झालेल्या आजच्या रेश्माला बऱ्याच महिला आदर्श मानतात. कारण रेश्मा सावंत यांच्या रूपाने त्यांच्या जीवनात अवतरलेल्या महिला उद्योजिका अहिल्यादेवीच आहेत.
लेखिका : राजेश्वरी जगदाळे सरकार
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा