भामट्या पुरोगामींचा मराठा द्वेष: ज्ञानेश महाराव
"यशाला अनेक बाप असतात, अपयशाला बाप नसतो !" ह्या उक्तीच्या चालीवरच्या "यशाला जात नसते ; अपयशाची जात मात्र आवर्जून सांगायची असते!" अशा प्रकारच्या उपदेशाला 'भालाफेक'पटू नीरज चोप्रा याने 'टोकियो ऑलिम्पिक'मध्ये सुवर्णपदक मिळाल्यावर 'सोशल मीडिया'तून ऊत आला होता. कारण नीरजचं कौतुक करताना काही जणांनी तो 'मराठा' असल्याचा उल्लेख केला. नीरज हा हरियाणा राज्यातल्या पानिपतचा. शेतकरी कुटुंबातला. कुस्ती खेळात 'सिल्व्हर मेडल' मिळवणारा रवी कुमार दहिया हादेखील हरियाणातला. सोनपतचा मराठा! हरियाणा आणि मराठा, हा संबंध ऐतिहासिक आहे. त्याला उजाळा नीरज आणि रवी कुमार यांनी आपल्या क्रीडा नैपुण्याने दिलाय.
दिल्लीपासून ९० किलोमीटर दूर असलेल्या पानिपत येथे एप्रिल १७६१ मध्ये अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि पेशव्यांचे सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांच्या मराठा सैन्यात घनघोर लढाई झाली. सदाशिवराव भाऊच्या साथीला मल्हारराव होळकर, विश्वासराव पेशवे, इब्राहिम खान गारदी, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, सोनाजी भापकर, सिधोजी घार्गे, आरवंदेकर, पुरंदरे- विंचुरकर आदि मराठा सरदार सैन्यासह होते. ही लढाई 'पानिपतचे तिसरे युद्ध' म्हणून ओळखली जाते.
'पानिपतची पहिली लढाई' १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर (अयोध्येतील वादग्रस्त 'बाबरी मशीद'वाला) यांच्यात झाली होती. जहिरूद्दीन बाबर (जन्म :१४ फेब्रु १४८३; मृत्यू : २६ डिसेंबर १५३०) हा मूळचा कझाकीस्तानचा. आईकडून तो चंगीझखान मुघलाचा वंशज. मध्य आशियात साम्राज्य स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याने आपल्या पूर्वजांची राजधानी- समरकंद, दोनदा लढाई करून जिंकली होती. १५१९ ते १५२४ ह्या दरम्यान बाबराने हिंदुस्थानावर चार स्वार्या केल्या. पण तो अपयशी ठरला. १५२६ च्या पानिपतच्या लढाईत मात्र तुलनेने कमी सैन्य असूनही त्याने सैन्याची शिस्त आणि तोफांच्या बळावर लोधीचा पराभव करून हिंदुस्थानात मुघल सत्तेचा पाया रोवला.
'पानिपतचे दुसरे युद्ध' उत्तर भारतातील 'हिंदू शासक सम्राट' हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ 'हेमू' आणि 'मुघल सम्राट' अकबर यांच्या सैन्यात नोव्हेंबर १५५६ मध्ये झाले. 'हेमू'कडे १,५०० हत्ती आणि १ लाखाचे सैन्य होते; तर अकबराजवळ केवळ २० हजारांचे सैन्य होते. 'हेमू' व त्याचे सैन्य त्वेषाने लढत होते. अकबराच्या सैन्याचा पराभवच होणार होता. पण 'हेमू'च्या डोळ्यास बाण लागल्याने तो घायाळ होऊन पडला. त्याने त्याचे सैन्य बिथरले. 'हेमू' पकडला गेला. अकबराने त्याचा शिरच्छेद करून पानिपतची दुसरी लढाई जिंकली.
पानिपतची पहिली आणि दुसरी लढाई; ज्यांचे सैन्य कमी होते, त्यांनी जिंकली! तिसऱ्या, १७६१ च्या लढाईतही तेच झाले. पानिपतावर लढण्यासाठी जाणाऱ्या पेशव्यांचा ताफा तीन-साडेतीन लाख लोकांचा होता. पण त्यात प्रत्यक्ष लढणाऱ्यांची संख्या ७०-७५ हजारांच्या आसपास होती. बाकीचे 'बुणगे' म्हणजे- यात्रेकरू, महिला, मुले व भोजनभाऊ होते. अब्दालीचे प्रत्यक्ष लढणाऱ्याचे सैन्य पेशव्यांच्या सैन्यापेक्षा अधिक होते. ते पेशव्यांच्या सैन्यासारखे बेशिस्तीचे नव्हते. ते लढण्यासाठी पानिपतात आले होते. म्हणून जिंकले.
अब्दालीने पेशव्यांचा, पर्यायाने मराठा साम्राज्याचा मोठा पराभव केला. ह्या पराभवातही लढवय्या मराठ्यांनी मोठा पराक्रम निर्माण केला. त्याची चिकित्सा इतिहास अभ्यासक आजही विविधांगाने करीत असतात. त्यातूनच हरियाणातील मराठ्यांची ओळख जगजाहीर झाली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित हानी झाली. हे 'लग्नात मुंज' उरकण्याच्या पेशव्यांच्या देव-धर्माच्या 'बुणगे'पणामुळे घडले. यामुळेच ''मराठ्यांना झाडाला बांधून ठेवले, तर झाडासकट पळतील,'' अशा वर्णनाची वेळ मराठ्यांवर ओढवली. ही संधी अब्दालीच्या सैन्याने साधली आणि लाख मराठे पानिपतावर कापले. त्यातून जे वाचले ते पळाले, परतले. ज्यांच्याकडे परतण्यासाठी काहीच शिल्लक राहिले नव्हते; ते पानिपतसह भोवतालच्या कर्नाल, सोनपत, कुरुक्षेत्र ह्या भागात राहिले. हरियाणाच्या मातीत, संस्कृतीत आपली ओळख ठेवून मिसळले. 'राजा रोड' ह्या संस्थानिकांच्या आश्रयाने राहिले म्हणून स्वतःची 'रोड मराठा' अशी ओळख सांगू लागले. त्यांनी अडीचशे वर्षं टिकवून ठेवलेली ही ओळख कोल्हापूरचे इतिहास संशोधक *डॉ. वसंतराव मोरे* यांनी मोठ्या परिश्रमाने लिखित स्वरूपात पुढे आणली आणि रोड मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांशी जोडण्याचं कार्य २००४-०५ च्या काळात 'मराठा सेवा संघ'चे संस्थापक-अध्यक्ष *ॲड. पुरुषोत्तम खेडेकर* यांनी केले. या 'मराठा मीलन'च्या कामात त्यांना 'आयएएस' अधिकारी *वीरेंद्र वर्मा* यांची विशेष साथ लाभली होती.
आज ७ ते ८ लाख लोकसंख्या असलेल्या हरियाणातील मराठ्यांना 'मीडिया' पेशवाईशी जोडत असले, तरी ते पहिल्या-दुसऱ्या बाजीरावचा जयघोष करीत नाहीत! तर सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमातही छत्रपती शिवाजी महाराजांची 'प्रतिमा पूजन' करून 'जय जिजाऊ! जय शिवराय!' अशा घोषणा देतात. 'शिंक' आली तरी 'छत्रपती की जय!' म्हणतात. नीरजने ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवण्यासाठी पानिपतच्या ज्या स्टेडियममध्ये नियमित सराव केला, त्याचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम' असं आहे.
ह्यात गैर काही नाही. महाराष्ट्राबाहेर गेले की, बहुतेक जण आपली ओळख 'महाराष्ट्रीयन' अशी न सांगता 'मराठा' अशीच सांगतात; किंवा तेथील स्थानिक तुम्हाला 'मराठा' म्हणूनच ओळखतात, स्वीकारतात. कारण मराठा शब्दात अनेक जाती-जमातींच्या लोकांना सामावून घेण्याचं सामर्थ्य आहे. त्यांचे बळ वाढवण्याचे चैतन्य आहे. म्हणूनच तिसर्या पानिपतात मागे राहिलेल्यांनी अपमानातीत जिण्यातही आपला स्वाभिमान आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी 'मराठा'पण स्विकारलं. त्यात सगळेच 'जातीचे मराठे' नाहीत. त्यात पाटील, भोसले, खोपडे, चोपडे, खंडागळे यांच्या प्रमाणे म्हात्रेही आहेत. प्रांतिक भाषेनुसार, त्या आडनावात थोडा बदल झाला आहे. परंतु, म्हैस, भिंत, पुरणपोळी असे शेकडो शब्द त्यांच्या वापरात आहे. हे महाराष्ट्राशी असलेले नाते दाखवण्यासाठी वीरेंद्र वर्मा आणि डॉ. वसंतराव मोरे यांनी एकत्रितपणे 'रोड मराठों का इतिहास' हा ग्रंथ लिहिला. त्याचे प्रकाशन २०१०मध्ये तेव्हाच्या 'राष्ट्रपती' प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. शेती आणि जोडधंदा 'पोल्ट्री' याच्या आधारे सधन झालेल्या ह्या 'रोड मराठा' समाजातील लोक स्वतःच्या नावापुढे आणि घराच्या पाटीवर 'मराठा' असा उल्लेख करतात.
तथापि, हा शब्द जातीच्या मराठ्यांनी वापरायचा नाही. तसा वापरल्यास प्रदेश वाचक 'मराठा' जातीवाचक होतो. तो पुरोगामी, समतावादी, जाती निर्मूलक म्हणवून घेणाऱ्यांच्या डोक्यात जातो. तेच नीरज चोप्राचे 'मराठा'पण सांगताच झाले.
'चपातीला पोळी' म्हणत ब्राह्मण्य किंवा बरबटाचे कढावर कढीत जातीचे दलितत्व सांगितले- दाखवले तर चालते! एकलव्यावरचा पौराणिक अन्याय सांगत गुणवंत-यशवंत आदिवासी असल्याची ओळख सांगितली, तर खपते. सात पदरी करंज्यांच्या रेसिपीतून 'सीकेपी' वा 'बोलाईचे मटना'तून धनगराची आठवण जागवलेली चालते. पण 'ऑलिम्पिक'मध्ये भारताला बारा वर्षांनी सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा 'मराठा' असल्याचे थेटपणे सांगितलेले चालत नाही. ही वैचारिक अस्पृश्यता झाली.
जात- वर्णव्यवस्था, जातीयता, जातिभेद हे अमानुष, अमानवी आहेत. त्याचा कुठल्याही काळातला व्यवहार-अंमल निषेधार्हच आहे. पण त्याने वास्तव बदलत नाही, जातव्यवस्था संपत नाही, ह्याचेही भान हवेच. हजारो जाती जमातीचा, भाषा-प्रांताचा विविध आहार-विहार वेशभूषेचा मिळून भारत देश बनला असल्याचे अभिमानाने सांगायचे! जाती-जमातीच्या संघटनांचे सन्मान-पुरस्कार महामानवांच्या नावाने घ्यायचे! पण नीरज चोप्राचे 'मराठा'पण दाखवले की कोल्हेकुई करायची, ही भामटेगिरी आहे.
अशानेच 'संविधान'चीही पोथी झालीय. जातीचा अहंकार बाळगणे चुकीचे. तर त्या अहंकाराला जातीनिशी विरोध करणे, हे महाचुकीचे ! हे असेच चालू राहिल्यास, लवकरच भारतीय लष्करातल्या 'मराठा रेजिमेंट' मधला आणि 'जनगण'मधील 'मराठा' शब्द उच्चारणे, हे जातीच्या मराठ्यांसाठी गुन्हा ठरेल!
■ (लेखनकाळ: १० ऑगस्ट २०२१)
-9819895800)
ज्ञानेश महाराव
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा