मा.खासदार छत्रपती संभाजीराजेंना अनावृत पत्र
मा. खा. छत्रपती संभाजीराजे
आपणास सस्नेह जय जिजाऊ !!
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात चर्चा, बैठका, पत्रकार परिषदा व कांही सवंग घोषणा याचे अमाप पीक आले आहे. एक मराठा म्हणून आपण देखील पुन्हा सवंग लोकप्रियता डोळ्यासमोर ठेऊन आडवा पडण्याची व आरक्षणासाठी महाराष्ट्रात दौरा करुन समाजाची भूमिका आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी २७ मे नंतरचा मुहूर्त निश्चित केल्याचे विविध प्रसार माध्यमाद्वारे समजले.
मा. खासदार साहेब मराठा क्रांती आंदोलनाचा तसेच मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता या नात्याने मला कांही प्रश्न सतावत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनातील एक नेतृत्व किंवा आरक्षणाचे कट्टर समर्थक म्हणून त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडून मिळतील ही अपेक्षा ठेऊन हा पत्र प्रपंच केला आहे.
-
मा. खासदार साहेब आपण छत्रपतींचे वशंज आहात. आपल्या समोर भाजपने देऊ केलेली राज्यसभेची खासदारकी तशी फार महत्वाची नव्हती व आजही नाही. आता या खासदारकीचा आपला कालावधी संपत आलेला आहे. पुढे भाजप सारखा चतूर पक्ष आपल्याला उमेदवारी देण्याची शक्यता वाटत नाही, हे आम्हाला जसे वाटते तसे आपल्याही लक्षात आले असेल असे गृहित धरण्यात हरकत नसावी. दुसरे म्हणजे मराठा आरक्षण प्रश्नी आपल्याला खासदारकीचा राजीनामाच द्यावयाचा असेल तर त्याची प्रसारमाध्यमा समोर तसेच जनतेसमोर वेळोवेळी वाच्यता करण्याची अजिबात गरज नाही. आपण हा राजीनामा राज्यसभेच्या सभापतीकडे चर्चेशिवाय तो पाठवू शकता. मग आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठा समाजातील कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला आहे की, आपण मागील पाच वर्षापासून खासदार आहात (जूलै २०१६ पासून) या काळात आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लागला नाही. आपण खासदार झाल्यानंतर दुस-याच महिन्यात महाराष्ट्रात क्रांती मोर्चांना सुरुवात झाली. एक मराठा म्हणून (मी खासदार म्हणून आलो नाही असे आपण मुंबईत म्हंटले होते) आपण सहभागी झाला होतात. पुढे मागील पाच वर्षात आपण सतत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रसार माध्यमासमोर बोलत आहात. आजही या पलीकडे तुमची कार्यपध्दती जात नाही. तेंव्हा आपण आपल्या पक्षाची तरफदारी करता की मराठा समाजाचे छत्रपती म्हणून मराठ्यांचा कैवार घेता याबद्दल तमाम मराठा समाजात संभ्रम आहे, तो आपण कसा दूर कराल हा आमचा प्रश्न आहे. इथे एक बाब प्रकर्षाने नोंदवावी वाटते ती म्हणजे आपल्या या नियोजित दौ-यास चंद्रकांत पाटील यांच्या शुभेच्छा आहेत. त्यातच भाजपा सोबत काम करणा-या आ. विनायकराव मेटे यांनी ५ जून रोजी बीडला जो मराठा समाजाचा मोर्चा आयोजित केला आहे, त्याला आपण उपस्थित राहणार आहात. यामुळे समाजात अशी चर्चा आहे की, आपल्या दौ-याला भाजपाचा तर वरदहस्त नाही ना? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपल्याला समाजाला देणे अपेक्षित आहे. कारण आपण मराठा समाजाचे नेते आहात असे घोषित केले आहे. अन हो अजून एक महत्वाचे म्हणजे मराठा क्रांती मोर्चाने कोणाकडेही नेतृत्व दिलेले नाही.
आपण मराठा समाजाचे खासदार म्हणून मा. पंतप्रधानांना भेटीसाठी चार पाच पत्र लिहिली परंतू त्याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली नाही असे तुम्हीच प्रसार माध्यमासमोर सांगितले. याचे दोन अर्थ निघतात. एक, चंद्रकांत पाटील म्हणतात त्या प्रमाणे मा. पंतप्रधानांना हा प्रश्न घटकराज्यापुरता मर्यादित ठेवावा वाटत असावा किंवा आपल्या पत्राला पंतप्रधानाच्या लेखी किंमत नसावी. छत्रपतीचे वंशज असलेल्या व संसदेचे सदस्य असलेल्या व्यक्तीला पक्षात व केंद्रशासनात काहीच महत्व नाही असा संदेश यामुळे तमाम मराठा समाजात गेला असेल तर आपली विश्वासहार्अता समजासमोर प्रश्नांकित झाली आहे, असा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा स्थितीत आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व कसे करणार व केले तरी जनता आपल्यामागे पुन्हा फरफटत येईल काय? या प्रश्नावर देखील समाजाला उत्तर मिळाले पाहिजे.
मा. खासदार साहेब, आपण मराठा आरक्षण प्रश्नी २७ मे नंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणार व पुढची दिशा ठरवणार असेही म्हंटले आहे. इथे एक प्रश्न उपस्थित होतो तो असा की, मागील पाच वर्षात आपल्या साक्षीने हे सर्व सोपस्कार पुर्ण झालेले आहेत. आता तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत काय चर्चा करणार, हा खरा प्रश्न आहे. कारण आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांना आता सांगण्यासारखे तसेच चर्चा करण्यासारखे कांही शिल्लक राहिले आहे असे आम्हाला वाटत नाही. तसेच आता रस्त्यावर समाजाला उतरुन हा प्रश्न सुटू शकत नाही, हे आमच्या प्रमाणे तुम्हालाही चांगले माहित आहे, मग आपला हेतू काय आहे याचा बोध होत नाही. या प्रश्नावर देखील चर्चा झाली पाहिजे. एखाद्या राजकीय पक्षात राहून, त्याची विचारसरणी स्विकारुन जनहिताचे लढे कधीच उभारले जाऊ शकत नाहीत. कारण सरकारची कार्यपध्दती, पक्षाची ध्येयधोरणे आणि सर्वसामान्य समाजाचा आक्रोश परस्पराशी मेळ खात नाहीत. तेंव्हा आपल्याला लढ्याचे नेतृत्व खरोखरच करावयाचे असेल तर सत्तात्यागाची राजकीय संस्कृती जोपासावी लागेल. केवळ जनतेची समजूत काढण्यासाठी हा खटाटोप चालला असेल तर आपणास क्षणिक सवंग लोकप्रियता मिळेल, मात्र जनतेला सदासर्वकाळ झुलवत ठेवून सत्तेत अखंडपणे राहाता येत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे, केवळ छत्रपती घराण्याचे वलय म्हणून सवंग लोकप्रियतेवर आरुढ होऊन समाजाच्या भावनेशी प्रतारणा आपल्याकडून होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.
-
आपल्याला हे देखील लक्षात असेलल की, मागील लोकसभा निवडणूकीत कोल्हापूरच्या जनतेने आपल्याला नाकारलेले आहे. असे असतानाही मराठा समाजाने विशेषतः मराठवाड्यातील तमाम मराठा समाजाने छत्रपतींचे वारसदार म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतले, आपण देखील घोषणा केले होती की, 'छत्रपती या पदवीसमोर बाकी सर्व पदे गौण आहेत, त्यामूळे मी कोणतेही पद स्विकारणार नाही.' तरीही आपण भाजपची उमेदवारी स्विकारली व संसद सदस्य झालात.
पुढचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आम्हाला सतावतो आहे, त्याचे देखील आपण निरसन करावे असे वाटते. काल-परवा प्रसारमाध्यमासमोर बोलतांना आपण राज्यातील कांही भागात दौरे करुन मराठा समाजाची भूमिका व समाजाचे प्रश्न समजून घेणार असे म्हंटले आहे. मा. खासदार साहेब मागील पाच वर्षापासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण मिळाले पाहिजे, गरीब शेतक-यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ७० ते ७५ टक्के गरीब असलेल्या समाजाला कांही सवलती मिळाल्या पाहिजेत, इत्यादी प्रश्नांना, मागण्यांना अनुसरुन पाच वर्ष सतत चर्चा झाली, संघटनांच्या हजारो बैठका झाल्या, समित्या-आयोगाचे गठन झाले, अनेक शिफारशी करण्यात आल्या. आपली एल्गार परिषद झाली तसेच संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण ‘शिव-शाहू यात्रा’, ‘छत्रपती रयतेच्या भेटीला’ इत्यादी उपक्रम राबवून आपण संपुर्ण महाराष्ट्रात फिरुन मराठा समाजाचे प्रश्न, समस्या, भूमिका जाणून घेतल्या, तेंव्हा आता पुन्हा दौरे काढून कोणते प्रश्न जाणून घेणार आहात. हेच आम्हांला समजत नाही.
मा. खासदार महोदय, आपल्याला मराठा समाजाच्या समस्यांची खरोखरच माहिती हवी असेल तर आम्ही तुम्हांला महाराष्ट्रातील पाच टक्के मुठभर श्रीमंत आणि राजकीय अभिजन मराठा वगळून उर्वरित समाजाचे प्रश्न त्यांच्या भूमिका आणि आक्रोश याबाबत अभ्यासपुर्ण माहिती देऊ शकतो. केवळ असे दौरे करुन जनमाणसाला प्रभावित करण्यात काहीही हाशील नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात. मराठा समाजातील आर्थिक मागासलेपण आपल्याला माहित आहे. तेंव्हा दौरे करुन हार-तूरे स्विकारणे आणि 'एक मराठा लाख मराठा ' अशा सवंग घोषणा देऊन सभा गाजवणे यापलिकडे काहीही साध्य होणार नाही. कदाचित यात आपला दौरा साध्य होईल मात्र समाजाच्या हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे आपण दौरे करण्याच्या भानगडीत पडू नये. या पेक्षा मराठा समाज मागसलेला नाही, त्यांचे मागासलेपण सिध्द होत नाही. या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर सुक्ष्म अभ्यास कसा होईल यावर सरकार दरबारी रचनात्मक-सकारात्मक पाऊले उचलली पाहिजेत असे आम्हांला वाटते आपणही चिंतन करा.
-
मा. छत्रपती महोदय इथे आणखी एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो ती अशी की, विदर्भाचे जेष्ठ नेते, शिक्षणतज्ञ मा. पंजाबराव देशमुखांनी एका ठिकाणी म्हंटले होते की, 'राजाचा व प्रजेचा धर्म एक नसतो.' याचा अर्थ शोषक आणि शोषित समाजाचे प्रश्न केवळ भिन्न-भिन्नच असत नाहीत तर ते परस्पराच्या हितसंबंधाशी छेद देणारे असतात. आपण छत्रपती वा राजे आहात म्हणून आम्ही हे विधान करत नाही तर इथे प्रस्थापित आणि विस्थापित अर्थात 'आहे रे' आणि 'नाही रे' यांच्या वेदना कशा वेगळ्या असतात हे सांगण्याचे प्रयोजन आहे. याचा अर्थ आपणाला गरीब मराठा समाजाच्या वेदना माहित नाहीत असा आमचा आक्षेप नाही. मात्र 'दाई आणि आई' मधला हा फरक आहे.
-
मा. छत्रपती, वर उल्लेख केल्याप्रमाणे पंजाबराव देशमुखांना विदर्भातील मराठ्याचा कुणबी म्हणून इतर मागासवर्गात समावेश केला. त्यांना मराठवाड्यातील प्रस्थापितांनी दौरा करु दिला नाही. आता मात्र सर्वांचेच दौरे, बैठका ज्या राजकीय अभिनेशातून होतात ती पध्दत मागास मराठा समाजाला लाभदायक ठरेल असे किंचितही वाटत नाही. एखाद्या मेंढराच्या कळपाप्रमाणे कुणाच्याही मागे जाऊन भाबडा विश्वास ठेवणे, आपल्या जातीचा दुराभिमान बाळगणे, आपलीच पिळवणूक करुन प्रस्थापित झालेल्या धनदांडग्याचे कौतूक करणे, एवढेच नाहीतर आपल्या जातीचा उमेदवार म्हणून प्रचार करणे, निवडून देणे. या प्रवृत्तींचा सर्वसामान्य मराठा समाजात झालेला अतिरेकच त्यांचे मागासलेपण अधोरिखेत होऊ देत नाही. याचा लाभ उठवत गरीब मराठा समाजाला सतत गृहित धरुन नागवण्यात आलेले आहे. आता आरक्षणाचे राजकारण करुन पुन्हा समाजाला नेतेमंडळी वेगळ्याच दिशेने घेऊन जात असतील तर त्यांच्यात सामील न होता छत्रपतींचे वशंज म्हणून आपण रयतेला शहाणे केले पाहिजे. आपली ही नैतिक जबाबदारी आहे.
-
मा. राजे या सर्व प्रश्नावर तसेच आमच्या भूमिकेवर आपल्याकडून रास्त उत्तराची अपेक्षा आहे.
आपलाच समाजबांधव,
डॉ. व्ही.एल. एरंडे
मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा