ads header

माननीय वसंतदादा पाटील सच्चा लोकसेवक



🚩मा.कै.वसंतदादा पाटील यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 🚩


वसंतराव बंडूजी पाटील जन्म १३ नोव्हेंबर १९१७ महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक लढे नोंदवले असतील,पण ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती ती नुसतीच ऐतिहासिक नव्हती तर ब्रिटिश हुकमतीला कृष्णेच्या पाण्याची ताकत दाखवणारी होती. सांगलीचे जेल फोडून, त्याच्या तटावरून पूर आलेल्या कृष्णेत ज्या बहाद्दर स्वातंत्र्य सैनिकांनी उड्या घेतल्या,त्यात वसंत दादा अग्रभागी होते. त्यांच्या शौर्याला अनेक अनेक सलाम.

१९४२ चं वर्ष म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातलं धगधगणारं वर्ष. महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जाव चा इशारा दिला आणि सारा देश रस्त्यावर उतरला. सांगली म्हणजे पूर्वीचा सातारा जिल्हा ही या लढ्यात धगधगत होताच.अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होते आणि बिनीचे साथीदार तुरुंगात होते. १९४२ च्या चळवळीत क्रांतिकार्यात भाग घेतल्याबद्दल वसंतदादा पाटलांना ब्रिटिशांनी सांगलीच्या जेलमध्ये डांबले होते. पण तुरुंगाला घाबरतील ते लढवय्ये कसले? त्यांनी तुरुंगात बसूनच तुरुंग फोडायचा जबरदस्त प्लॅन तयार केला. नुसता तयार केला नाही तर तो फोडलाही.
शनिवार दि.२४ जुलै १९४३ रोजी अभेद्य असे सांगलीचे जेल फोडले. नुसते जेल फोडले नाही तर पहारेकऱ्यांनाही कोंडले. किल्ल्याच्या उंच तटावरुन खंदकात उडी मारून हे क्रांतिकारक बाहेर पडले. पहारेकरी सावध झाले. या वेळी तुरुंग फोडणाऱ्या क्रांतिकारकांच्या मागे १२५ ब्रिटिश घोड़ेस्वार पोलिसांची तुकड़ी व लष्कराच्या दोन गाड्या असा पाठलाग सुरु झाला. एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या थरारक सीनलाही लाजवेल असा हा प्रसंग. सांगलीच्या गर्दी भरल्या चौकातून आणि रस्त्यावरून हे क्रांतिकारक दुथड़ी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीकड़े धावले. नदीकाठावर ब्रिटिश पोलिस आणि क्रांतिकरकांच्यामध्ये गोळीबार चालू झाला. यामध्ये अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव शहीद झाले. बाबुराव जाधव यांचा मृतदेह कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहात तसाच वाहून गेला. वसंतदादा पाटील यांना देखील गोळी लागली. काही क्रांतिकारकांनी पूर आलेल्या कृष्णेच्या पाण्यात उड्या टाकल्या आणि पालिकड़चा काठ गाठला. वसंतदादा आणि राहिलेल्या क्रांतिकारकांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दादांएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात झाला नाही. दादा न शिकलेले. पण शिकलेला माणूस दादांच्या पुढे फिका पडत असे.
दादांचे वागणे, बोलणे, राहणे, पोशाख किती साधा. साध्या माणसांचा साधा प्रतिनिधी म्हणजे दादा. १९५२ साली ते आमदार झाले. सलग पाच वेळा आमदार होऊनही दादांनी कधीही ‘मला मंत्री करा,’ असे काँग्रेस नेत्यांना सांगितले नाही. ६७ ते ७२ ही पाच वर्षे दादा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते.
दादा चौथीपर्यंत शिकलेले. म्हणजे शिक्षण जवळ जवळ नाहीच. पण व्यवहाराचे त्यांचे शिक्षण इतके मोठे होते की, दादा एक विद्यापीठच होते. न शिकलेल्या या माणसाला विद्यापीठाने पुढे डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली.
दादांचा मोठेपणा असा जगदमान्य झाला. दादा पाटबंधारे मंत्री असताना चाफेकर चीफ इंजिनीअर होते. दादा त्यांना विचारायचे, ‘कुठल्या खो-यात किती पाणी आहे?’ चाफेकर सांगायचे, ‘अमूक टीएमसी आहे.’ दादा म्हणायचे ‘टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा..’ दादांचा प्रत्येक शब्द असा व्यवहारी असायचा.
दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कशातही फरक पडला नाही. ते मुख्यमंत्री असोत किंवा राज्यपाल ,दादांच्या भोवती माणसे नाहीत, असा कधी दिवस नव्हता. आणि माणसांना भेटून दादा कंटाळले असेही कधी घडले नाही.
आज जी नवी मुंबई उभी राहिली त्या नव्या मुंबईतल्या जमिनी सिडकोसाठी ताब्यात घेण्याचा सगळा विषय दादा मुख्यमंत्री असताना हाताळला गेला. त्याला आता चाळीस वर्षे झाली. फार मोठे आंदोलन झाले. दि. बा. पाटील त्या आंदोलनाचे नेते होते.
दादा मुख्यमंत्री होते म्हणूनच त्या काळात शेतक-याला चाळीस हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला. दादा शेतक-यांचे कैवारी होते.
राज्य कर्मचा-यांच्या संपात दादांची भूमिका कर्मचा-यांच्या ठाम विरोधात असायची. संघटित लोकांना खूप फायदे मिळतात.असंघटित शेतक-याला असे फायदे मिळत नाहीत, हे दादा ठासून सांगायचे. पुढे दादांनी शेतकरी संघटना काढली. त्यासाठी ते मोर्चा काढून रस्त्यावरही उतरले.
दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भाषेची अडचण कधीच आली नाही. मला इंग्रजी येत नाही, हिंदीत चांगले बोलता येत नाही, याचा संकोच त्यांना कधीच वाटला .
निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत.
दादांना पदाचा लोभ कधीच नव्हता. त्यांच्या वागण्यात अत्यंत साधेपणा होता. दादांचे साधेपण असे कितीतरी प्रसंगात जाणवत राहायचे. वसंत दादांचे महाराष्ट्राच्या उभारणीत सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी उद्योग ,विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुकुट पालन, दुग्धविकास या क्षेत्रात सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, तेल गिरण्या ,कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले.
1956 मध्ये त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्या वेळी त्यांनी स्वत शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा याचे शेतकर्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उत्पादनांची निर्मिती करावी, असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण आरोग्य इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे .
राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्ये वसंतदादांचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळे 1967 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले
       ख-या अर्थाने ज्यांना लोकनेता म्हणता येईल, असे दादा, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक,  राजाराम बापू ,यशवंतराव मोहिते अशी विकासाचा ध्यास घेतलेली माणसे आता होणे नाही.
       १ मार्च १९८९ रोजी मुंबई येथे दादांचे निधन झाले. 
      अशा या थोर लोकनेत्याला स्मृतिदिनामीत्त विनम्र अभिवादन !
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा