ads header

विषमुक्त जीवन l नैसर्गिक बीयाची लागण

एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी माझे विचार मांडत आहे.

ग्रामीण महाराष्ट्र मध्येच नव्हे तर सर्व ग्रामीण भारतात भाजी खाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्याच वेळेला स्वतःची शेती पडीक ठेवून रोजंदारीवर कामे करण्याकडे लोकांचा कल झुकत आहे याला कारण आहे, रेशनवरील स्वस्त धान्य. जर दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ या दराने धान्य मिळत असेल तर स्वतःच्या शेतीत सतत राबुन येणाऱ्या तांदुळाचा उत्पादन खर्च 22 ते 24 रुपये पडत असेल तर शेती का करायची हा प्रश्न बऱ्याच जणांनी मांडला. त्याऐवजी रोजंदारीवर पंधरा दिवस काम करावे, हे दोन आणि तीन रुपये किलोने धान्य विकत घ्यावे. उरलेले पंधरा दिवस चकाट्या पिटाव्या. राजकिय पुढाऱ्यांच्या मागे फिरावे. छानपैकी गाव गप्पा हाणाव्यात, व्यसने करावीत हे जास्त सोपे आहे. त्यामुळे कसेही करून, लाच देऊन, कमी उत्पन्नाचा दाखला मिळवायचा, केशरी रंगाचे कार्ड मिळवायचं म्हणजे मग जास्तीत जास्त फुकट काय मिळेल फुकट योजना काय असतील हीच आयुष्याची इतिकर्तव्यता. पण या रेशनच्या धान्याचे दुष्परिणाम या अडाणी लोकांच्या कुठे लक्षात येत आहेत? सरकार रेशन ही कल्पना का राबवते त्याला काही कारणे आहेत. 1 शेतकऱ्याला हमीभाव मिळावा नाहीतर नफेखोर व्यापारी भाव पडतील. 2 खऱ्या गरिबांना स्वस्त धान्य मिळावे 3 एका विभागात दुष्काळ पडला तर दुसऱ्या विभागातील धान्य आणून त्याचा पुरवठा करणे. 4 चौथे आणि अति महत्वाचे कारण म्हणजे जर काही अतिभयानक आपत्ती सर्व राष्ट्राला आली तर आपल्या देशातील सर्व लोकांना किमान आठ महिने तरी अन्नधान्याचा पुरवठा व्हावा. त्यामुळे रेशनवरील धान्य ही संकल्पना चूक नाही. पण आळशी लोकांनी त्याचा गैरफायदा उचलला आहे जो प्रगत शेतकरी आहे तो फक्त शेती करत नाही गुरेढोरे बाळगतो कोंबड्या पाळतो काहीजण शेळी मेंढी बकरी पण पाळतात. अशी जनावरे बाळगणे म्हणजेच चोवीस तासांची बांधिलकी. तरच शेती सर्व बाजूंनी परिपूर्ण होते व फायदेशीर होते अन्यथा फायदेशीर होत नाही. पण ही चोवीस तासांची बांधिलकी कोण करणार? म्हणून शेती सोडून रोजगार करावा. आता हा रोजगार कसा करतात तर पूर्वी सकाळी आठ वाजता लोक कामाला जायची आता नऊ नव्हे तर साडेनऊला लोक येतात आल्यावर न्याहरीला बसतात मग काम सुरू होते. अकरा वाजता चहाचे अपेक्षा असते. एक ते तीन हक्काची सुट्टी. परत कामाला सुरुवात केल्यानंतर चार साडेचार वाजता चहाची अपेक्षा. नंतर सहा ऐवजी साडेपाच ला आवराआवरीची घरी जाण्याची तयारी सुरू  यातील कामाची वेळ आहे ती तरी शंभर टक्के प्रामाणिक पणाने करतात का? तर नाही त्यातही तंबाखू खाणे आणि गप्पा मारणे चालूच असते. म्हणून शेती ओसाड ठेवून रोजंदारी करणाऱ्यांची संख्या वाढते आहे कल वाढतो आहे याचे दुष्परिणाम काय आहेत ते पाहू या.
शेतकरी सरकारला धान्य विकतात ते पूर्णपणे आणि खडखडीत वाळवून विकत नाहीत. कारण वजन कमी होईल. त्यामध्ये पाच ते आठ टक्के बाष्प असतेच. असे हे ओले धान्य सरकार विकत घेते व साठवते. सुमारे 20 ते 25 फूट उंचीच्या थप्प्या लागतात. साठवण्याच्या सोयी चांगल्या नसतात. वरुन  पाणीसुद्धा गळते. अशा एकदा एकावर-एक थप्प्या पडल्या की त्या तीन ते पाच वर्षे जागेवरून हलत ही नाहीत मग या धान्याला कीड लागणार नाही का? त्याकरता दर तीन ते चार महिन्यांनी विषारी ओल्या कीडनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतात. म्हणजेच कमीत कमी 12 ते 20 विषाच्या ओल्या फवारण्या त्या धान्यावर होतात. एक वेळ तांदूळ थोडा धुतला जाईल पण गहू ज्वारी तर धुण्याची पद्धतच नाही. म्हणजे हे सर्वच्या सर्व विष घरातल्या सर्वांच्या पोटात जाणार या आळशी लोकांचे सोडून द्या हो. त्यांनी कड्यावरून उडी टाकून आत्महत्या कराव्यात. आमचं काही म्हणणं नाही. पण त्यांच्या कच्चा बच्चनचे काय? त्या पोटातल्या, एक ते पाच वर्षांच्या व इतर सर्वांनी काय पाप केले आहे की त्यांना हे विष जन्माच्या आधीपासून खायला घालायचे? याचाच दुसरा अर्थ असा आहे की पुढच्या वीस तीस चाळीस वर्षात संपूर्ण ग्रामीण भारत कॅन्सरग्रस्त होईल सर्व प्रकारचे रोग बळावतील. औषधांवर खर्च करण्याची ऐपत राहणार नाही व भारताचे राष्ट्र म्हणून अस्तित्व सुद्धा धोक्यात येईल येईल. सर्व राजकारणी पक्षांनी (खरं म्हणजे पक्षांना हे वैयक्तिक स्वार्थाकरता हे शहाणपण सुचणार नाही पण) सर्व राजकीय सुजाण कार्यकर्त्यांनी तरी विचार करायचा की आपण काही स्मशान भारतावर राज्य करणार आहोत काय?
याला मी माझ्या अल्पबुद्धी उपाय काढला आहे. खरं म्हणजे हा उपाय नाहीये तर होणारे दुष्परिणाम लांबवण्याचा एक अल्प प्रयत्न आहे.
ढोबळ कल्पना पुढील प्रमाणे आहे.
आपल्याला ग्रीन पाॅडस् म्हणजेच चवळी घेवडा वाल पापडी फरसबी अशा शेंगवर्गीय भाज्यांबद्दल लक्ष एकत्रित करायचे आहे. ग्रामीण भागामध्ये सामान्यतः प्रत्येकाचे घर दोन तीन चार गुंठ्यांमध्ये तरी असते. घरी थोडी मोकळी जागा असते. आता शेंगवर्गीय ज्या भाज्या आहेत त्याचे बरेचसे वेल हे आठवड्यातून अर्धा किलो शेंगभाजी तरी नक्कीच देतात. जी एका कुटुंबाला एक दिवसाला पुरेशी आहे. अशा पाच प्रकारची बियाणी जर प्रत्येक घरात पोचली तर दररोज एक सकस विषमुक्त भाजी त्याला घरच्या घरी मिळेल. आता याचा फायदा काय होईल तर या सर्व हिरव्या शेंग भाजी चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत 
1 यातील हिरवा भाग हा अँटिऑक्सिडंट असतो म्हणजेच फ्री रॅडिकल्सचा तो नाश करतो. परिणाम कॅन्सरचा धोका कमी होतो.
2 यातील सोल्युबल आणि नाॅन सोल्युबल फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ यामुळे पोट साफ होते. यकृताचे कार्य सुधारते. शरीरातील विषं बाहेर फेकली जातात. रक्त व पर्यायाने हृदयाचे कार्य सुधारते. या तंतुमय पदार्थामुळे मोठ्या आतड्यातील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे आरोग्य आरोग्यही सुधारते.
3:ही शेंगवर्गीय भाजी असल्यामुळे त्यामध्ये डाळीचे बी आहे त्यामुळे आपोआपच प्रथिनांचा पुरवठा वाढेल. शरीरामध्ये जमा होणारी हानिकारक रसायने धूवून निघतील. स्नायू हाडे रक्त इत्यादींना बळकटी येईल.
आता ही योजना कशी राबवता येईल? 
ग्रामीण भागातील शाळांमध्ये चौथी पाचवी व सहावी ची सर्व मुले या योजनेमध्ये भाग घेतील. सातवीपासून मुलांना शिंगे फुटायला सुरुवात होते त्यामुळे सातवी व त्यापुढील मुले या योजनेमध्ये नाहीत.
चौथी, पाचवी व सहावी या वयोगटातील मुले आपल्या आई-वडीलांनंतर आपल्या गुरुजनांचे ऐकतात. त्यांना त्यांचा धाक वचक असतो वर्गात सर्वांसमोर आपल्याला उभे करतील अशी भीती पण असते. ग्रामीण भागामध्ये सामान्यतः प्रत्येकाचे घर दोन तीन चार गुंठ्यांमध्ये असते. घराभोवती थोडी मोकळी जागा असते. जर आपण यांनां  पाच प्रकारचे घेवडे वाल फरसबी पापडी इत्यादी शेंगवर्गीय भाज्यांची बियाणी जर प्रत्येक घरात पोचली तर दररोज सकस विषमुक्त भाजी त्यांना घरच्या घरी मिळेल. यासाठी ग्रामीण भागातील शाळांमधील गुरुजींचे सहकार्य लागेल. त्यांनी चौथी पाचवी सहावी च्या मुलांना पाच प्रकारच्या वाल शेंगांची चार चार बियाणी द्यायची. म्हणजे किमान दोन तरी उगवून येतील. हा शाळेचा प्रोजेक्ट म्हणूनही राबवता येईल व त्याला गुण दिले जातील. या या सर्व मुलांनी आपल्या घराच्या कुंपणा शेजारील जागेत अंदाजे चार फूट रुंद व पंधरा फूट लांब अशी जागा निवडून तेथे या शेंग वर्गीय भाज्या लावायच्या. घरातील सर्वांनी तेथेच हात पाय धुवायचे, जेवण झाल्यावर हात तेथेच धुवायचे म्हणजे यातील कल्पना अशी आहे की या वयोगटातील मुलांना 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम करायला लागू नये व त्यांना आपणच तयार केलेल्या भाज्यांचा आनंद मिळेल.
ग्रामीण भागामध्ये अजून एक पद्धत अशी आहे की घराभोवतीचा काडीकचरा जो आहे तो रोज झाडून काढायचा आणि त्याला काडी लावायची थोडक्यात जाळायचा. त्याऐवजी या मुलांनी आपल्या वडिलांकडून एक खड्डा खणून घ्यावा व त्याच्यावर घरातल्या दोन तीन चार गुंठ्या मधील काडीकचरा त्या खड्ड्यात टाकावा. त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर करण्याची सर्व माहिती व साहित्य  त्याला शाळेमध्ये दिली जाईल म्हणजे त्याचे उपयुक्त खता मध्ये रूपांतर होईल व त्याच वेळी हे सर्व खत हे त्यानेच लावलेल्या झाडांना मिळेल. 
अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्व ग्रामीण भागांमध्ये लिंबू विकत घेणे व खाणे ही पद्धत अस्तित्वात नाही बहुतांशी वेळा लिंबाचे झाड हि नसते त्यामुळे या सर्व बियाण्याबरोबर एक लिंबाचे झाडही देण्याची इच्छा आहे. त्यामुळे क जीवनसत्वाचा पुरवठा भरपूर झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल म्हणजेच साथीचे आजार आटोक्‍यात राहतील. डोळ्यांचं आरोग्य सुधारेल. शरीरात जमा होणारी सर्व हानीकारक रसायने धूवुन निघतील. 
सर्व शरीराची इम्युनिटी मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून एक वर्षानंतर आजारपण व औषधांवरील खर्चात किमान 25 टक्के बचत होईल व दीर्घकालीन विचार केला तर आरोग्य खूपच सुधारेल.

मी ही योजना संगमेश्वर तालुक्यामधे 22 शाळा व 650 मुलांमधे राबवली. ज्या दऱ्याखोऱ्यांमधे जवळपास आठवडा बाजारही भरत नाही भाजी मिळत नाही अशा ठिकाणी स्वखर्चाने देशी बियाण्याचे (heirloom seeds) वाटप केले.
12  प्रकार च्या भाज्या - वाल, पापडी, बारमाही कारले, इ. असे प्रत्येकी चार बियाणी (किमान पन्नास) असे वाटप केले.

ही योजना मी एप्रिल 2019 मधे राबवली. 

अनिल थत्ते चिंचवड पुणे तसेच बुरंबाड माखजन तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी फोन नंबर
9850828218
9545558218
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा