अपात्र उमेदवार प्रा. लक्ष्मण हाकेचे सदस्यत्व रद्द करा
सोलापूर -: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांची सदस्य नियुक्तीच्या जाहिरातीमधील उमेदवारांसाठीचे (वयोमर्यादा व शैक्षणिक अहर्ता) नियम व अटी आणि महाराष्ट्र मागासवर्ग आयोग अधिनियम, 2005 चे कलम 3 आणि 4 (च) नुसार अपात्र उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे पत्राव्दारे केली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामध्ये राज्यातील महसूल विभागातून सहा सदस्य, तज्ञ सदस्य आणि सचिव स्तर सदस्य, याप्रमाणे एकूण नऊ सदस्य शासनाने नियुक्त केले आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यापैकी (मुख्यमंत्री सचिव स्तर) सदस्य प्रा. लक्ष्मण हाके हे अपात्र उमेदवार असतानासुध्दा मा. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, प्रा. लक्ष्मण हाके यांची बेकायदेशीरपणे मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड केली. मागासवर्ग आयोगाच्या जाहिरातीनुसार सदस्यांची वयोमार्यादा दि. 1 जुन, 2020 रोजी किमान 45 वर्ष व कमाल साठ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. परंतु, प्रा. लक्ष्मण हाके यांचे आजरोजीचे वय 43 वर्षे असल्याने ते या पदांकरीता ते अपात्र आहेत. तसेच लक्ष्मण हाके यांना समाजशास्त्र, मानववंशशास्त्र विषयातील संशोधानाचा कोणताही अनुभव नसल्याने हाके हे शैक्षणिक अहर्तामध्येही अपात्र आहेत. तसेच लक्ष्मण हाके हे सदस्य सचिव (मुख्यमंत्री सचिव स्तर) या पदांकरीता सुध्दा अपात्र आहेत. कारण मागासवर्ग आयोग अधिनियमानुसार, आयोगाचे सदस्य सचिव हे स्वतंत्र पद नसुन सामाजिक न्याय विभागातील सह संचालक या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला व जो राज्य शासनाचा अधिकारी आहे किंवा होता, अश्या व्यक्ती किंवा उमेदवारांलाच सदस्य सचिव होता येते. त्यामुळे प्रा. लक्ष्मण हाके हे (मुख्यमंत्री सचिव स्तर) सदस्य सचिव या पदासाठीही अपात्र असल्याचे योगेश पवार यांनी निवेदनात नमुद करून अपात्र उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांची बेकायदेशीरपणे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केलेली निवड तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा