ads header

आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता; १६ हजार पदे तातडीने भरणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई, दि. ६ : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
१०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाचे १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्व पदे भरल्यानंतर त्याच निश्चित सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर जाणवेल, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
#Job
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा