माता जिजाऊ : (मुक्त छंद काव्य)
माता जिजाऊ
जय भवानी! जय शिवाजी!
बोल बोलता अंगी सळसळे रक्त
शिवराज्य उभे करणाऱ्या माता,
जन्मल्या लखूजी जाधवच्या कन्या सिंदखेड्यात.
अवगत केल्या साऱ्या विद्या
विविध गुणांनी परिपूर्ण झाल्या.
भार्या झाल्या शहाजीराजे भोसलेच्या.
खंबीरपणे पती पाठी उभ्या राहिल्या
बलाढ्य शत्रु यवनांच्या विरोधात.
स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप दिले
केले ऐतिहासिक कार्य मोठे.
शिवबाचा जन्म झाला शिवनेरी गडावर.
दादोजी कोंडदेव संगे सांभाळला शिवबास.
बाळपणी बाळकडू पाजले शिवबाला,
सांगुनी पराक्रमी गोष्टी महाभारत व रामायणातल्या.
बीज पेरले स्वराज्य स्थापनेचे तया अंगी.
शिवबाने ही शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची,
चिमुकल्या बाळ गोपाळ मावळ्या संगे.
" शिवबा ते छत्रपती शिवाजी राजे "
असा प्रवास घडवला मातृवत्सलतेने,
देऊनी स्वराज्य निर्मितेचे धडे.
सर्व धर्म पालन व पर स्त्री माते समान,
संस्कृती बाणून घेतली शिवरायानी.
धन दौलत आली हाती तोरणा घेते वेळी.
बहुजन सुखाय बहुजन हिताय समजुनी
मंदिरे न बांधता धन उपयोगिले रयतेसाठी.
धन्य झाली माता छत्रपती राज्यभिषेक सुवर्ण सोहळा पाहुनी डोळां
पंचतत्वात विलीन झाल्या स्वपन साकारलेले पाहुनी.
साधू संतानी ही महती वर्णावी अशी थोर
पुण्यात्मा राजमाता जिजाऊ.
©सौ. शोभा वागळे.
मुंबई.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा